कोल्हापूर : मेडिकलमधील पैसे बँकेत भरण्यासाठी जाताना लिफ्ट मागून दुचाकीवर मागे बसलेल्या अज्ञाताने दुचाकीस्वाराच्या पाठीवरील सॅकमधील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा प्रकार सोमवारी (दि. १०) दुपारी साडेबारा ते पावणेएकच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय ते किरण बंगल्यादरम्यान घडला. याबाबत मेडिकलमध्ये काम करणा-या तरुणाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीपीआर परिसरातील एका मेडिकलमध्ये काम करणारा तरुण सोमवारी दुपारी मेडिकलमधील पैसे भरण्यासाठी ताराबाई पार्कातील बँकेत निघाला होता. ५० हजारांची रोकड ठेवलेली सॅक पाठीला अडकवून तो दुचाकीवरून बाहेर पडला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याला एका अनोळखी व्यक्तीने हात करीत लिफ्ट मागितली.दुचाकीस्वाराने मदतीच्या भावनेने त्याला लिफ्ट दिली. किरण बंगल्याजवळ अज्ञाताला उतरून बँकेत गेल्यानंतर तरुणाला सॅकमधील ५० हजारांची रोकड लंपास झाल्याचे लक्षात आले. पैसे वाटेत कुठेतरी पडले असतील असे समजून तो पुन्हा सीपीआरपर्यंत गेला. लिफ्ट मागितलेल्या तरुणानेच पैशांची चोरी केल्याची खात्री पटताच त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.
लिफ्ट घेतली अन् चालकाच्या सॅकमधील ५० हजाराची रोकड लंपास केली; कोल्हापुरातील घटना
By उद्धव गोडसे | Published: June 11, 2024 12:16 PM