समीर देशपांडे ।कोल्हापूर : कायमस्वरूपी अशी शक्यतो गावातच नोकरी असावी, चांगलं स्थळ बघून लग्न करावं, शक्यतो शहरामध्येच स्थायिक व्हावं अशी सर्वसामान्य मानसिकता आढळत असताना कोल्हापूरच्या मयूर सोनटक्के या युवकाने मात्र वेगळी वाट चोखाळली आहे. ‘आॅनलाईन’ नोकरी करीत देशोदेशी फिरत असणाºया मयूरने आपली जीवनसाथीही व्हिएतनामची निवडली असून, त्यांचा विवाह आता डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे होणार आहे.
बाबूजमाल परिसरात राहणारे सतीश सोनटक्के आणि संस्कृतची शिकवणी घेणाºया सुखदा यांचा मयूर हा चिरंजीव. विद्यापीठ हायस्कूल, स. म. लोहिया कॉलेज आणि भारती विद्यापीठातून बीसीए अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मयूरने हैदराबाद, मुंबई येथे नोकरी केली; पण रोज आॅफिसला जाऊन नोकरी करण्यात त्याला स्वारस्य नव्हते. सन २०१० नंतर तो बंगलोरला गेला. न्यूयॉर्कस्थित कंपनीच्या ‘आॅनलाईन जॉब’साठी त्याची निवड झाली.
नोकरी ‘आॅनलाईन’ असल्याने पहिल्यांदा दक्षिण भारत, मग हिमाचल प्रदेश त्याने फिरून घेतला. मग २०१६ मध्ये तो थायलंड, कंबोडिया, इंडोनिशिया फिरून आला. आॅफिस नाही, बॉस नाही. पुन्हा थायलंडला राहिला, तेथून तो व्हिएतनामला गेला तेथील हॅनाई शहरामध्ये त्याची ओळख बँकेत नोकरी करणाºया जॉय फाम हिच्याशी झाली आणि काही महिन्यांनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गणेशचतुर्थीला मयूर आणि जॉय कोल्हापुरात आले होते. आता पुन्हा दिवाळीसाठी दोघेही कोल्हापुरात आले आहेत. डिसेंबरमध्ये ते धर्मशाला येथे लग्न करणार आहेत. व्हिएतनामहून १५ आणि कोल्हापूरहून १५ मंडळी हिमाचल प्रदेशात लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत.
‘आॅनलाईन’ काम करणाºया मंडळींना धर्मशाला येथे एकत्र राहण्याचे व्यवस्थापन सध्या मयूर करतो. पाच वेगवेगळ्या खंडातील नऊजण तीन महिन्यांसाठी धर्मशालेत आले होते. त्यांना सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मयूर आणि त्याच्या मित्रांनी घेतली होती.गोव्यातही अशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची ते सोय करणार आहेत. कोल्हापूरच्या युवकाची ही भन्नाट कहाणी भटक्यांसाठी प्रेरणादायी आहे.पर्यटनवाढीला मोठा वावथायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया यांसारखे लहान देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला अजूनही विदेशी पर्यटकांची म्हणावी तशी पसंती नाही. केवळ शहरांभोवतीचे पर्यटन न वाढता ग्रामीण भारतही देखणा आहे. त्याचे मार्केटिंग करण्यासाठी ‘रिमोट एक्स्पोअर्स’ही वेबसाईटही मयूरने सुरू केली आहे. या लग्नासाठी माझ्या आई-वडिलांनीही मोठ्या मनाने मान्यता दिल्याचे मयूरने सांगितले.
जॉय चपात्या करते, रांगोळी काढतेजॉय हिची कोल्हापूरला येण्याची ही दुसरी वेळ. दिवाळी असल्यामुळे सासूबार्इंनी तिला साडी नेसवली. चपात्या लाटायला शिकवलं. एवढंच नव्हे, तर गुरुवारी तिने सकाळी घरासमोर रांगोळीही काढली. पर्यटन अभ्यासिका अरुणा देशपांडे यांच्या घरी गुरुवारी तिने भारतीय संस्कृतीची माहिती देणारी पुस्तके, कॅलेंडर्सही चाळली. ती मराठीतील बाराखडी शिकली असून, बोलण्याचाही प्रयत्न करते. मला गणपती आणि दिवाळी हे दोन्ही फेस्टिव्हल खूप आवडल्याचे ती सांगते.