गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरासह व परिसराला रविवारी जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर पावसाने तडाखा दिला. त्यामुळे उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तालुक्यातील हलकर्णीसह उत्तूर परिसर व चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी वळवाने हजेरी लावली.
गतवर्षी मान्सून परतीचा पाऊस व वळीव डिसेंबरअखेर सुरूच होता. त्यामुळे रब्बीचे हुकमी पीक असणाऱ्या ज्वारीची पेरणी उशिरा झाल्याने यंदा ज्वारीसह गहू, हरभरा, कांदा, लसूण काढणीच्या वेळीच पाऊस झाल्याने मोठा फटका बसणार आहे. तोड झालेल्या ऊसपिकाच्या खोडवा फुटीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.
दरम्यान, गडहिंग्लजच्या आठवडा बाजारासाठी आलेले नागरिक, गवताची गंजी रचणारे शेतकरी, वीट व्यावसायिकांचीही मोठी तारांबळ उडाली.
-----------------------------------
* महागावमध्ये घराचे पत्रे उडाले
महागाव : महागावसह परिसराला दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. गडहिंग्लज-नेसरी मार्गावरील आनंदा अर्जुन खणदाळे यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेले. उडालेले पत्रे एका वाळलेल्या झाडामध्ये अडकल्याने झाडानजीकच असणाऱ्या विद्युततारांचे नुकसान व संभाव्य धोका टळला.
-------------------------------------
* फोटो ओळी : महागाव (ता. गडहिंग्लज) येथे वादळी वाऱ्याचे उडालेले पत्रे असे झाडामध्ये अडकल्याने पुढील नुकसान टळले.
क्रमांक : २१०३२०२१-गड-०८