गडहिंग्लज : माहेरहून ३ लाख रुपये घेऊन यावेत यासाठी तगादा लावून नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती अमित श्रीपती खानविलकर व नणंद सुप्रिया अश्विन आयरे दोघेही (रा. गिजवणे, ता. गडहिंग्लज) यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
प्रियांका अमित खानविलकर या पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी,१२ जून २०२० रोजी प्रियांका आणि अमित यांचा विवाह झाला आहे. विवाहानंतर प्रियांका ही गिजवणे येथील मधल्या गल्लीत रेणुका मंदिरानजीकच्या सासरच्या घरी राहते.
दरम्यान, विवाहानंतर तीन महिन्यांतच पती अमित आणि नणंद सुप्रिया हे दोघे मिळून कोणत्या ना कोणत्या कारणावरून प्रियांकाला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. पत्नी म्हणून तू शोभत नाहीस असे म्हणत त्यांनी तिला शिवीगाळ करून मारहाणही केली.
आपल्या कामधंद्यासाठी तिने आई-वडिलांकडून ३ लाख रुपये आणावेत यासाठी तगादा लावला. पैसे घेऊन आल्याशिवाय तू नांदायला येऊ नकोस, अशी धमकीही त्यांनी तिला दिली.
पीडित प्रियांका खानविलकर हिच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हेडकाॅन्स्टेबल विठ्ठल मुळीक अधिक तपास करत आहेत.
बातमी -२
गडहिंग्लज तालुक्यात ७६ नवे रुग्ण
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात गुरुवारी नव्या ७६ रुग्णांची भर पडली. त्यापैकी गडहिंग्लज शहरात २७ तर ग्रामीण भागातील ४९ आहेत. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ३ हजारांच्यावर पोहचली आहे.
गुरुवारी प्राप्त अहवालात भडगावमध्ये ९, कडगावात ८, हिरलगेत ६ , दुंडगेत ३ तर हरळी बु, हसुरसासगिरी, गिजवणे, बसर्गेत प्रत्येकी २ आणि महागाव, मुत्नाळ, मुगळी, शेंद्री, अत्याळ, जरळी, बेळगुंदी, बटकणंगले, हुनगिनहाळ, हसुरवाडी, सरोळी, चिंचेवाडी, कानडेवाडी, तेगिनहाळ, तळेवाडी येथे प्रत्येकी १ बाधित रुग्ण सापडला आहे.