इचलकरंजी : भूत लागल्याचे सांगून अघोरी कृत्य करण्यासह माहेरहून ४० तोळे सोने व फॉर्च्युनर गाडीची मागणी केली, तसेच लग्नात घेतलेले ६१ तोळे सोने व दहा लाख काढून घेऊन फसवणूक केली. त्याची मागणी केल्याने घरात घुसून ठार मारण्याची धमकी देऊन तोडफोड केल्याप्रकरणी आर्सिया असगर केरुरे (वय २४, रा. कुडचे मळा) च्या तक्रारीवरून तिच्या पतीसह दहा जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पती असगर सलीम केरुरे, सासू नूरजहाँ सलीम केरुरे, सासरा सलीम पापालाल केरुरे, शाहरुख सलीम केरुरे, आफरोज शाहरुख केरुरे (सर्व रा. हुपरी), हिना सलीम सनदे (रा. पुलाची शिरोली), शबाना फकीर, लुकमान फकीर (दोघे रा. रुकडी), मौलाना जावेद (रा. गडहिंग्लज) व मुजावर (रा. करवेश), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी येथील आर्सिया हिचा विवाह हुपरी येथील असगर केरुरे याच्याशी झाला आहे; परंतु विवाह झाल्यापासून आर्सिया हिचा सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तिच्या अंगात भूत आहे, असे म्हणत तिला गडहिंग्लज येथील मौलाना जावेद आणि करवेश येथील दर्ग्यातील मुजावर यांच्याकडे नेऊन अघोरी कृत्य केले.त्याचबरोबर लग्नात दिलेले ६१ तोळे सोने आणि दहा लाख रुपये काढून घेतले. मुलीला नांदवायचे असेल तर ४० तोळे सोने व फॉर्च्युनर गाडी देण्याची मागणी केली. त्याला वडिलांनी नकार देत लग्नात दिलेले सोने व पैसे परत मागत मुलीला नांदवणार नाही, असे सांगितले असता २ जूनला कुडचे मळा येथील घरात घुसून तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणत आर्सियाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरातील साहित्याची तोडफोड करत व पडदे जाळत नुकसान केले. त्यानंतर आर्सियाने छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.