दीपक जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘केएमटी’तून निवृत्त झालेल्या वाहकाने वयाच्या ७८ व्या वर्षी सार्वजनिक रिकाम्या जागेत तब्बल ३०० झाडे लावून जगवत आपले निसर्गप्रेम जपले आहे.येथील शास्त्रीनगरात राहणारे बाबूराव साळुंखे यांनी राहत असलेल्या घरासमोर विविध प्रकारची लहान-मोठी अशी तीनशे झाडे लावून आपली आवड जपली आहे. साळुंखे हे महानगरपालिका परिवहन विभागातून १९९९ ला निवृत्त झाले. शास्त्रीनगरला म्हाडाच्या ३०० चौरस फुटांच्या घरात ते कुटुंबासमवेत राहतात. ते मूळचे सदलग्याचे. त्यांना लहानपणापासून शेतीची आवड होती. निवृत्तीनंतर त्यांनी आवड म्हणून ते राहत असलेल्या घरासमोरील छोट्या जागेत विविध प्रकारची लहान-मोठी झाडे लावली व जगवली आहेत. पोटच्या मुलाप्रमाणे ते झाडांना जपतात. या कामात त्यांना कुटुंबीय आवडीने मदत करतात. आज त्या झाडापासून त्यांना छान सावलीबरोबर ल्ािंबू, आंबा, फणस अशी फळेही मिळतात. झाडे लावण्याबरोबर ते रोपांचे वाटपही मोफत करतात. राहत असलेल्या परिसरात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तसेच कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमातून ते सक्रिय आहेत. आपण पर्यावरणासाठी, स्वत:च्या आरोग्यासाठी झाडे लावली पाहिजेत, पर्यावरण आणि आरोग्य या दोन गोष्टी आपल्या जीवनात महत्त्वाच्या आहेत, असे ते आवर्जून सांगतात.लावलेली झाडे..फणस, आंबा, नारळ, निलगिरी, डाळींब, करंज, लिंब, चाफा, उंबर, कढीपत्ता, याचबरोबर सब्जा, जाफरानी पान, लिंबू, पारिजातक, गवती चहा, आले, हळद, कर्दळ, ओवा, जायशिखा, रानतुळस, मोगरा, जास्वंद, आदी रोपांचा समावेश आहे.
स्वखर्चातून तब्बल तीनशे झाडे जगवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:33 AM