कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये गुरूवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत आणखी २५ रूग्णांची भर पडली असून ही एकूण संख्या ४२७ झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त नागरिक आहेत. यातील बहुतांशी हे मुंबईसह बाधित जिल्ह्यांमधून आलेले आहेत.आतापर्यंत ४२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात २० ठिकाणी नागरिकांचे स्वॅब घेण्याची सोय करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एक तर डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयामध्ये एक अशा दोन प्रयोगशाळांमध्ये सध्या नागरिकांच्या स्वॅबची तपासणी करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यापूर्वी मुंबई, पुण्यासह बाधित जिल्ह्यातील नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची अट घातली होती. तरीही २३ हजारवर नागरिक त्यानंतरही कोल्हापूर जिल्ह्यात आल्याचे सांगण्यात आले. या सर्वांना बाधित जिल्ह्यातून परवानगी देतानाही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. परंतू आता बहुतांशी स्वॅब तपासणी झाल्यामुळे आता पुन्हा नागरिकांना सरसकट परवानगी दिली जाणार आहे.