कोल्हापूर : संयुक्त प्रवेश परीक्षेतील (जॉईंट एंटरन्स एक्झाम (जेईई मेन्स) गणित आणि भौतिकशास्त्रावर आधारित प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांचा कस लागला. ही परीक्षा मंगळवार (दि. १) पासून सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या आयआयटी, एनआयटीसारख्या राष्ट्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या वतीने (नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीए) घेण्यात येणारी परीक्षा रविवार (दि. ६ सप्टेंबर)पर्यंत दोन सत्रांमध्ये होणार आहे.
कोल्हापूरमध्ये ताराबाई पार्क, शिये, संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि इचलकरंजी येथे परीक्षा केंद्रे आहेत. रोज सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशा दोन सत्रांत परीक्षा होणार आहे. मंगळवारी दिवसभरात सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३०० गुणांचा पेपर असून त्यामध्ये गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील प्रश्न आहेत.
रसायनशास्त्रातील प्रश्न सोपे होते. मात्र, गणित आणि भौतिकशास्त्राचे प्रश्न सोडविताना कस लागल्याचे काही परीक्षार्थ्यांनी सांगितले. संगणक आधारित पद्धतीने (सीबीटी मोड) ऑनलाईन परीक्षा होत आहे.