कागल : राज्यातील तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. याला व्यापारीवर्ग कारणीभूत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे हे दिशाभूल करणारे आहे. तुरीच्या प्रश्नाला राज्य शासनच जबाबदार आहे. तूर घोटाळ्यातील गैरव्यवहार कधी शोधायचे ते शोधा. मात्र, पहिल्यांदा हलाखीत सापडलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी तूर खरेदीबद्दल प्रतीकात्मक आंदोलन म्हणून तहसीलदार किशोर घाडगे यांना पाच किलो तूर देत शासनाचा निषेध नोंदविला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भैया माने, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, नगरसेवक आनंदा पसारे, आदी उपस्थित होते. आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या लालकिल्ल्यावरून भाषण करताना शेतीमालाला चांगला भाव देऊ, असे सांगितले होते. गतवर्षी तुरीला चांगला दर आला होता. यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र, तुरीचे उत्पादन निघून बाजारपेठेत आल्यावर भाव प्रचंड प्रमाणात खाली कोसळले. शासनाने तूर खरेदी करण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकरीही थांबला; पण आता खरेदीचे नाव काढायला शासन तयार नाही. बाजार समितीच्या आवारात तूर विक्रीसाठी आलेल्या वाहनांच्या रांगा लागून राहिल्या आहेत. तूर विक्रीतून या वाहनांचे भाडेही निघते का नाही, अशी अवस्था आहे. शासन मात्र व्यापारीवर्गावर खापर फोडत आहेत. मोठा घोटाळा समोर येत आहे. या प्रकरणाची चौकशी तर कराच, पण आधी तूरडाळ खरेदी करा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशीही मागणी आ. मुश्रीफ यांनी केली. (प्रतिनिधी)
तूर प्रश्नास शासनच जबाबदार
By admin | Published: May 03, 2017 12:38 AM