कोल्हापूर : महाराष्ट्रातील पर्यटकांना जिल्ह्णाकडे आकर्षित करण्यासाठी येत्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने तीन-चार दिवसांचे पर्यटनाचे पॅकेज तयार करून पर्यटन महोत्सव घ्यावा तसेच ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून विकसित करण्यासाठी सर्वंकष पर्यटन आराखडा तयार करावा, असे निर्देश सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिले.पर्यटनविषयक जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महापौर वैशाली डकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वैशाली चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.कोल्हापूर शहरात महालक्ष्मी मंदिर परिसरातील पर्यटकांसाठी २४ तास माहिती देणारे ‘एमटीडीसी’चे सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असलेल्या सुविधांचे पर्यटकांसाठी बळकटीकरण करण्यासाठी शासकीय विश्रामगृहे, विनावापर शासकीय निवासी इमारती, यापूर्वी पर्यटन विकास योजनेतून बांधण्यात आलेल्या इमारतींच्या उपयोगितेवर भर देण्यात येईल, असे सांगून कोल्हापूर दर्शनासाठी पर्यटक वाहतुकीसाठी टूरिस्ट बस उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली. पन्हाळा-पावनखिंड हा पदभ्रमंती मार्गास ऐतिहासिक पर्यटनाचा दर्जा देऊन पर्यटकांना बारमाही आकर्षित करण्यासाठी सुविधा निर्माण कराव्यात. त्याबाबतचा आराखडा सादर करावा,असे सांगून पर्यटकांच्या बदलत्या गरजा जाणून त्याप्रमाणे निर्माण करावयाच्या सुविधांचा आराखडा तयार करण्यासाठी एमटीडीसी व तज्ज्ञ खासगी संस्थांचे सहकार्य घ्यावे. बैठकीत पंचगंगा घाट परिसर विकास आराखडा, भुदरगड किल्ला परिसर विकास आराखडा, रामलिंग धुळोबा देवस्थान विकास आराखडा प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. पर्यटकांसाठी टुरिस्ट सर्किट करावीतधार्मिक, वन, साहसी, गडकिल्ले, खाद्यपदार्थ, ऐतिहासिक, पुरातन वास्तू ही पर्यटकांसाठीची आकर्षण स्थळे विकसित करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. पर्यटकांच्या पसंतीची टुरिस्ट सर्किट तयार करावीत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
कोल्हापुरात डिसेंबरमध्ये पर्यटन महोत्सव
By admin | Published: August 04, 2015 12:57 AM