अणुस्कुरा : शाहूवाडी तालुक्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बर्की धबधब्यावर रविवारी सुट्टीमुळे हजारो पर्यटकांची गर्दी होती. मुलामुलींसह अनेकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला. हजारोंच्या गर्दीमुळे बर्की गावाला जत्रेचे स्वरूप आले होते.गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम घाटामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील बर्की येथील साडेतीनशे फुटांवरून कोसळणाऱ्या ‘तापेरा’ धबधब्याचे पाणी पर्यटकांना खुणावत असते. फेसाळणाऱ्या पाण्यातून निर्माण होणारे पांढरेशुभ्र रूप, खळखळ वाहणाऱ्या ओढ्याचा मनाला सुखावणारा आवाज निसर्गप्रेमींना खूप उत्साहित करतो. पावसात मनसोक्त भिजल्यानंतर पर्यटकांना मेजवानी म्हणून गावरान चिकन व नाचणीच्या भाकरीचा आस्वाद घेता येतो.हिरवीगार दाट वनराई, किलबिल करणाऱ्या पक्ष्यांचे आवाज, घनदाट वृक्षवेलींवर पावसाच्या कोसळणाऱ्या सरीवर सरी... अशा मनाला उत्साहित करणाऱ्या वातावरणात पर्यटक मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत आहेत.वनविभागाच्या विविध सुविधा- पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, रेलिंग, ओढ्यावर लोखंडी पूल, धबधब्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या, निसर्ग निरीक्षणासाठी मनोरे, वन अमृत उत्पादनांचे स्टॉल, इत्यादींचा पर्यटकांना लाभ घेता येतो.बोटिंगचा अनोखा अनुभव - या वर्षीपासून बर्कीच्या धबधब्यालगतच्या तलावामध्ये खासगी बोटिंग सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. निसर्गप्रेमींसाठी ती पर्वणी ठरत आहे.बर्कीला जाण्याचा मार्ग - कोल्हापूर ते बर्की (बाजारभोगावमार्गे) ५० कि.मी. कऱ्हाड, मलकापूर, येळवण जुगाई ते बर्की- ७० कि.मी.
Kolhapur- बर्की धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, गावाला जत्रेचे स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:45 PM