कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर, ऐतिहासिक भवानी मंडप, न्यू पॅलेसचा परिसर पाहून डेक्कन ओडिसीतील पर्यटकांनी ‘कोल्हापूर इज द ग्रेट’ असे गौरवोद्गार काढले. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे बुधवारी सकाळी डेक्कन ओडिसीतून कॅनडा, अमेरिका, आदींसह ३६ भारतीय पर्यटकांचे सकाळी आगमन झाले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने ‘डेक्कन ओडिसी’तील पर्यटकांचे हलगी व तुतारीच्या निनादात स्वागत केले. या पर्यटकांचे शाही स्वागत केल्यानंतर संयोजकांतर्फे पर्यटकांना कोल्हापुरी भगवा फेटा बांधण्यात आला. त्यानंतर ते न्यू पॅलेस येथे आले. त्यांनी पॅलेसमधील वस्तुसंग्रहालय पाहिले. त्यानंतर सर्वजण टाऊन हॉल येथील वस्तुसंग्रहालय पाहण्यास गेले. तेथील वास्तू व संग्रहालयाची ठेवण पाहून परदेशी पर्यटकांनी त्याची स्तुती केली. भवानी मंडपात दांडपट्टा, लाठी-काठी ही मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके झाली. प्रात्यक्षिकांनंतर परदेशी पाहुण्यांनी स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या अंबाबाई देवीचे दर्शन आणि मंदिराच्या वास्तू व धार्मिकशास्त्राची माहिती घेऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पर्यटकांनी प्रसाद आणि कोल्हापुरी जेवणाचाही आस्वाद घेतला. सातासमुद्रापार प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी चपलाही पाहुण्यांनी खरेदी केल्या. या खरेदीनंतर ‘लावण्यसंध्या’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहिल्यानंतर पर्यटकांनी सायंकाळी गोव्याकडे जाण्यासाठी ‘डेक्कन ओडिसी’तून प्रस्थान केले.
कोल्हापूरचे सौंदर्य पाहून भारावले पर्यटक
By admin | Published: December 31, 2015 12:13 AM