निपाणी : तालुक्यातील शिरगुप्पी हे गाव कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या ३७०० लोकसंख्या असलेल्या गावात १०० लोक आयसोलेट आहेत, तर १० च्या वर रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे १६ एप्रिलनंतर ११० लोकांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिले होते. त्यातील ४० ते ५० अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती गावकरी देत आहेत. निपाणी तालुक्यतील याच गावात कोरोना रुग्ण जास्त असल्याने चिंता वाढली आहे. आत्तापर्यंत वेगवेगळ्या कारणांनी २७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ५ ते ६ जण कोरोनाने मृत झाल्याचे समोर आले आहे.
निपाणी शहराच्या जवळच असलेल्या शिरगुप्पी गावात १६ एप्रिल २०२१ ला थंडी, ताप असलेले रुग्ण होते. हळूहळू हे रुग्ण वाढीस लागल्याने काही नागरिकांनी स्वॅब दिले होते. ११० नागरिकांनी स्वॅब दिल्यानंतर ४० ते ५० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, पण स्वॅब घेतल्यानंतर काही अहवाल १४ दिवस २० दिवसांनी आल्याने नागरिकांमध्ये गोंधळ होता. स्वॅबचा अहवालच लवकर येत नसल्याने आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावातील काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून याची सगळी नोंद शासनाकडे नाही. त्यामुळे गावाची नेमकी स्थिती समोर येत नाही.
गावाला आलेली मदत
खासदार अण्णासाहेबी जोल्ले यांनी आढावा बैठक घेतली.
ग्रामपंचायतीने सॅनिटायझर फवारणी केली आहे
रोटरी क्लबचे अध्यक्ष महांतेश हिरेकोडी, सेक्रेटरी नितीन शिंदे यांनी १० ऑक्सिमीटर गावाला दिली आहेत.
समाधी मठाचे मठाधीश प्राणलिंग स्वामीजी यांनी गावात इम्युनिटी बुस्टर वाटप केले.
प्रतिक्रिया....
गेल्या २ दिवसांत कोरोना स्थिती आटोक्यात आली असून नागरिक प्रतिसाद देत आहेत. पंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येत असून सॅनिटायझरची फवारणी केली आहे. सर्वांचे सहकार्य असून लवकरच गाव कोरोनामुक्त होईल. नागरिकांनी घाबरू नये.
आनंद कुंभार
ग्रा. पं. अध्यक्ष शिरगुप्पी