कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात लस कमी येत असल्याने वशिलेबाजीने लस घेण्याचे प्रकार वाढले आहेत. सीपीआरमधील लसीकरण कक्षाकडे जाणारा जाळीचा दरवाजा उघडून येथील कर्मचारीच वशिल्याने लस देत असल्याचा व्हिडिओ मंगळवारी सायंकाळपासून समाजमाध्यमावर फिरत आहे. याही आधी अशा तक्रारी झाल्यानंतरही सीपीआरचे वरिष्ठ याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना ७०/८० डोस झाले की, लस संपल्याचे सांगायचे आणि नंतर आपले मित्र, हितचिंतक यांना दुसऱ्या जाळीच्या दाराकडून आत सोडायचे असे प्रकार सुरू आहेत. मंगळवारी एक महिला आरोग्य कर्मचारी आपण पाठीमागे थांबून आठ ते दहा जणांना आत सोडत असून, नंतर ती स्वत: आत जात असल्याचे चित्रफितीमध्ये स्पष्ट दिसत आहे. या महिला कोण आहे? ती ओळखताही येते. मात्र, सीपीआरचे वरिष्ठ तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत.
यातूनच असंतोषाचा भडका उडाला तर हाणामारी सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा सीपीआरच्या प्रशासनाने तातडीने हे वशिलेबाजीचे लसीकरण थांबवावे, अशी मागणी होत आहे.