इचलकरंजी : येथील शांतीनगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण नगरपालिकेकडून थांबविण्यात आल्याच्या निषेधार्थ तेथील नागरिकांनी मोर्चा काढून नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना घेराव घातला. सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यामुळे रस्त्याचे बंद केलेले काम पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर घेराव संपुष्टात आला.शांतीनगर परिसरामध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा आणि सदरच्या निविदांची योग्य ती प्रक्रिया न करता डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे चालू असलेले रस्त्याचे काम बंद करावे, अशा आशयाची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याकडे केली होती. सदरच्या तक्रारीवरून शांतीनगर परिसरातील रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले होते.शांतीनगर परिसरातील रस्त्याचे काम अचानकपणे बंद झाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवक रवी रजपुते, श्रीरंग खवरे, आदींच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चा नगराध्यक्षांच्या दालनात घुसला आणि नगराध्यक्षा बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना घेराव घातला. त्यावेळी झालेल्या चर्चेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून रस्त्याचे काम स्थगित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार करून त्यांना भंडावून सोडले. अखेर रस्त्याचे काम पुन्हा चालू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन संपुष्टात आले. यावेळी भाजपचे धोंडिराम जावळे, नरेश नगरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)इचलकरंजीतील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना नगरसेवक रवी रजपुते, श्रीरंग खवरे यांनी निवेदन दिले. यावेळी धोंडिराम जावळे, नरेश नगरकर उपस्थित होते.
नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2016 12:39 AM