कोल्हापूर : देशात सध्या भगव्या भांडवलीशाहीचा विषारी प्रयोग सुरू आहे, असा गंभीर आरोप राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी रविवारी केला. अशा परिस्थितीत धर्मनिरपेक्ष लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्र सेवा दलात कडव्या सैनिकांची फौज वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्र सेवा दलाच्या अमृतमहोत्सवी मेळाव्यात अध्यक्षपदावरून ‘धर्मांधतेचे धर्मनिरपेक्ष लोकशाहीला आव्हान’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा, किसान संघर्ष समितीचे नेते डॉ. सुनीलम उपस्थिती होती. सदर बझारमधील कोरगावकर हायस्कूलमध्ये हा मेळावा झाला. डॉ. वैद्य म्हणाले, हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी संघ परिवार सक्रिय आहे. मोदी जाणीवपूर्वक गोंधळाची परिस्थिती निर्माण करून देशाच्या एकतेला बाधा आणत आहेत. ते भांडवलदारांचे दलाल बनले आहेत. राम आणि हराम, राष्ट्रप्रेम व देशद्रोह हे सत्ताधारी ठरवीत आहेत. त्याविरोधात आता राष्ट्र सेवा दलानेही रस्त्यावर येऊन लढा उभारण्याची गरज आहे. पटेल म्हणाल्या, धर्मांधताच केवळ धर्मनिरपेक्षतेला आव्हान देत नाही. महाश्रीमंत, समतावादी विचार न पटलेले, राज्यघटना मान्य नसलेले असेही लोक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर घाला घालीत आहेत. सुराणा म्हणाले, ‘सनातन’ची विचारधारा हिंसेला प्रोत्साहन देणारी आहेत. याच विचारधारेतून डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. कलबुर्गी यांची हत्या झाली आहे. यावेळी प्राचार्य टी. एस. पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमास व्यंकाप्पा भोसले, बाबासाहेब नदाफ, राष्ट्र सेवा दलाचे राजा अवसक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अनंत आजगावकर, प्रा. विठ्ठल बन्ने, प्रा. किसनराव कुराडे, जे. बी. बारदेस्कर, सुरेश शिपूरकर, एम. एस. पाटोळे, आदी उपस्थित होते.दंगली पेटवा...धर्माचा वापर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला जात आहे. सांगली, इचलकरंजी परिसरात दंगली पेटवा आणि दोन खासदार, चार आमदार निवडून आणा, असा प्रयोग यापूर्वी झाला आहे, असा थेट आरोप पटेल यांनी केला.
देशात भगव्या भांडवलशाहीचा विषारी प्रयोग
By admin | Published: February 29, 2016 12:45 AM