कोल्हापूर : साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रक, ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांची पुरवठा करणारे चालक हे नोटरीच्या कराराद्वारे तोडणी मुकादमांना लाखो रुपयांची उचल देत असतात. मात्र गेल्या कांही वर्षापासून षडयंत्र रचून खोटे मुकादम आणि मजूर उभे करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रक, ट्रॅक्टरमालकांची लाखो रुपयांची फसवणुक करुन पोबारा करतात, अशांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी महाराष्ट्र राज्य उस वाहतूकदार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निवेदन स्वीकारले.कारखाना चालू होण्याच्या हंगामात अनेक मुकादम टोळ्या ट्रक आणि ट्रॅक्टरमालकांकडून उचल घेतात आणि नंतर केलेल्या कामातून त्याची परतफेड करतात, अशी पध्दत प्रचलित आहे. मात्र गेल्या कांही वर्षापासून काही मुकादम आणि मजूर जाणून बुजून षडयंत्र रचून बनावट कागदपत्रे, ओळखपत्र, चेक, खोटा रहिवाशी पत्याच्या आधारे लाखो रुपयांच्या मोठ्या रक्कमा उचल करुन फसवणूक करुन पोबारा करत आहेत.या मुकादम, मजूरांना शोधण्यासाठी गेल्यास ते सापडत नाहीत. स्थानिक पोलिसही मदत करत नाहीत. अशाच प्रयत्नात सोलापूर जिल्ह्यात गेलेल्या उस वाहतूकदार मालकाला जीवे मारले आहे. ट्रक आणि ट्रॅक्टर मालक शेतजमीन, स्थावर मिळकत आणि वाहने बँका, वित्तिय संस्थांना तारण देउन कर्जाउ रक्कम उभी करतात. ती परतफेड करणे त्यांना अशक्य होउ लागले आहे यात काहीनी आत्महत्याही केल्या आहेत. अशाप्रकारे फसवणुक सुरु राहिल्यास अनर्थ उद्भभवेल. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यास किमान दिलेली उचल वसूल होईल. संबंधित टोळी मुकादम व मजूरांवर कारवाई करावी, अशी मागणी उस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील, प्रविणकुमार शेट्टी, दिग्विजय जगदाळे, अशोक कुन्नूरे, विठ्ठल पाटील, विद्याधर पाटील यांनी केली आहे.दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दसरा चौकातून निघालेला हा ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाला सर्वपक्षीय शेतकरी नेतेही उपस्थित होते. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, सांगलीचे माजी आमदार नितिन शिंदे, सांगली भाजपचे युवा नेते ऋुतुराज पोवार सहभागी झाले होते. या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील सुमारे पाचशेहून अधिक वाहतूकदार वाहनांसह सहभागी झाले होते.
कोल्हापूर: ऊस वाहतूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर 'ट्रॅक्टर मोर्चा', राजू शेट्टींही सहभागी
By संदीप आडनाईक | Published: November 05, 2022 7:13 PM