जयसिंगपूर : शहरातील सर्वच व्यवहार सरसकट सुरू करा, अन्यथा बंद करा, या मागणीसाठी मंगळवारी व्यापारी आक्रमक झाले होते. पालिका प्रशासन व पोलीस कर्मचारी एकाच ठिकाणी बसणाऱ्या फेरीवाल्यांना बसवून व्यापाऱ्यांवर कारवाई करीत असल्याच्या कारणावरून शहरातील व्यापाऱ्यांनी थेट नगरपालिकेत जाऊन आपले प्रश्न मांडले.
लॉकडाऊनच्या नियमाप्रमाणे शहरात अंमलबजावणी होत असताना, व्यापाऱ्यांना वेठीस धरून दंडात्मक कारवाई केली जात असल्याने पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी दुपारी व्यापारी एकत्र आले.
थेट पालिकेत जाऊन त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शासनाने दिलेल्या नियमानुसार कोणतेही फेरीवाले विक्री करीत नाहीत. सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझर या नियमांचे पालन करूनही व्यापारी वर्गावर प्रशासन कारवाई करीत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे युवराज शहा यांनी केला.
यावेळी मुख्याधिकारी टिना गवळी म्हणाल्या, जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेले नियम पाळणे गरजेचे असून, त्यानुसारच प्रशासन कारवाई करीत आहे. यावर व्यापारी निर्मल पोरवाल म्हणाले, बंदला आमचा विरोध नाही. विनाकारण व्यापाऱ्यांना त्रास दिला जाऊ नये. त्यामुळे सरसकट सर्वच व्यवहार सुरू करा, अन्यथा बंद ठेवा, अशी मागणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अर्जुन देशमुख, राहुल बंडगर, प्रवीण राजोपाध्ये, भगवंत जांभळे, सुदर्शन चौगुले, अनिल खाडे यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते.
----------------------
कोट - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन काम करीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. व्यापाऱ्यांचे प्रश्न जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडून योग्य तो निर्णय घेऊ, तोपर्यंत व्यापाऱ्यांनी संयम बाळगावा.
- संजय पाटील-यड्रावकर, उपनगराध्यक्ष