कोल्हापूर : कोरोनाबाबतच्या कमी-जास्त होणाऱ्या आकड्यांच्या खेळामध्ये आता आम्हाला अडकून पडायचे नाही. शहरातील सर्व दुकाने सोमवार (दि. २८)पासून सुरू करण्याचा निर्धार व्यापारी, व्यावसायिकांनी केला आहे. सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत दुकाने सुरू ठेवणार असल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.अत्यावश्यक सेवेतील दुकाने सध्या सुरू आहेत. कोल्हापुरातील कोरोनाच्या पॉझिटिव्हिटीचा रेट सध्या कमी होत आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये तो आणखी कमी येईल, असे वाटते. सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर शहर हे स्वतंत्र युनिट करून येथील सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात कोल्हापूर चेंबरने घेतलेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
सरकारकडून कोणताही निर्णय होऊ दे, आम्ही मात्र कोल्हापूर चेंबरच्या बैठकीत दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवार (दि. २८)पासून दुकाने सुरू करणार असल्याचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हापूरमधील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे. पुढील तीन दिवसात हा रेट आणखी कमी होईल, असे वाटते. त्यामुळे कोल्हापूरचा अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश होऊन दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळेल, अशी आशा व्यापारी, व्यावसायिकांना लागली आहे.