लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या फटक्यातून कसेबसे सावरून व्यापार पूर्ववत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोल्हापुरातील व्यापारी, व्यावसायिकांना आता महापुराचा दणका बसला आहे. लक्ष्मीपुरी, शाहुपुरी, व्हिनस कॉर्नर परिसरातील विविध दुकाने महापुराच्या पाण्यात गेल्याने तेथील व्यापारी, व्यावसायिकांचे सुमारे दोनशे कोटींचे नुकसान झाले आहे. या पूरबाधित व्यापारी, व्यावसायिकांना राज्य शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने केली आहे.
कोरोनाचा सलग दुसऱ्या वर्षी कोल्हापुरातील व्यापार, उद्योगांना फटका बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने तीन महिने बंद राहिली. कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाल्यानंतर शासनाकडे वारंवार मागणी आणि पाठपुरावा करून अखेर दुकाने सुरू करण्यास व्यापारी, व्यावसायिकांनी परवानगी मिळवली. गेल्या आठ दिवसांपूर्वी दुकाने सुरू झाली, त्यानंतर चार दिवसांत शहराला महापुराने गाठले. त्यामध्ये प्रामुख्याने व्हिनस कॉर्नर, शाहुपुरी, नागाळा पार्क, लक्ष्मीपुरी, दुधाळी या परिसरातील किराणा, धान्य, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तू, डिजिटल प्रिटिंगच्या दुकानांमध्ये महापुराचे पाणी शिरले. पाणी वाढणार असल्याचा अंदाज आल्याने गुरूवारी बहुतांश व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानातील साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. काहींना मात्र साहित्य स्थलांतरित करणे शक्य झाले नाही. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरामध्ये अनेक दुकानांचे नुकसान झाले होते. या व्यापारी, व्यावसायिकांनी दुकानांचे नूतनीकरण केले होते. मात्र, यावर्षीच्या महापुराने त्यांच्या दुकानातील फर्निचर, साहित्याचे नुकसान झाले आहे.
चौकट
‘कोल्हापूर चेंबर’मध्ये विमा कक्ष
पूरबाधित व्यापारी, व्यावसायिकांना विम्याचा लाभ मिळविण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर चेंबरमध्ये स्वतंत्र विमा कक्ष सुरू केला जाणार आहे. त्यामध्ये विमा मिळविण्याचा अर्ज भरणे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळविणे, आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात जिल्ह्यातील व्यापार, व्यवसाय क्षेत्राला सुमारे बाराशे कोटींचा फटका बसला होता. त्यावेळी पूरबाधित व्यापारी, व्यावसायिकांना राज्य सरकारने सरसकट ५० हजारांची मदत केली होती. यावेळी शहरातील पूरबाधित व्यापारी, व्यावसायिकांना सुमारे दोनशे कोटींचा फटका बसल्याचे सध्या दिसते. त्यांना शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा. या पूरबाधित दुकानांचे शासनाने लवकर सर्वेक्षण करावे. कोल्हापूर चेंबरकडून त्याबाबत पाठपुरावा केला जाणार आहे.
- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज