कोल्हापूर : राज्य सरकारकडे कोरोना स्थितीचा अहवाल प्राप्त होताच काही जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध उठविण्याबाबत तत्काळ निर्णय घेतले जातात; पण कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील निर्बंध उठविण्यास विलंब लावला जात असल्याबद्दल व्यापारी वर्गात अस्वस्थता आहे. रुग्णसंख्या कमी येत नसल्याने शासन निर्णय घ्यायला तयार नाही आणि व्यापाऱ्यांचे तर मोठे नुकसान होत आहे, अशी कोंडी झाली आहे
दरम्यान, या संदर्भात व्यापाऱ्यांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी व पुढील धोरण ठरविण्यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे आज, शनिवारी सकाळी १०.३० वाजता जनता बाजार चौकात कोपरा सभेचे आयोजन केल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.
कोल्हापूरमधील सर्व व्यापार सुरू करण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव दिला. महानगरपालिकेने ना हरकत दाखल दिला. पालकमंत्र्यांनी व आमदारांनी प्रयत्न करूनही शासनाने अद्याप निर्णय दिला नाही. त्यामुळे पुढे काय हा प्रश्न व्यापाऱ्यांच्या पुढे आहे. सलग तीन महिन्यांचा लॉकडाऊन, एका वर्षांत दोन प्रदीर्घ लॉकडाऊन व्यापाऱ्यांसाठी काळ ठरले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे सर्व निकष पाळण्यासाठी तयार असूनही, ठरावीक दुकानदारांना व्यापारापासून वंचित ठेवू नये. हा त्यांच्यावर अन्याय असून वेगवेगळ्या खर्चामुळे व्यापारी मेटाकुटीला आला आहे. सरकारकडे सनदशीर मार्गाने मागणी करूनही न्याय मिळत नसल्याची व्यापाऱ्यांमध्ये भावना निर्माण झाली आहे.
उद्या, रविवारपर्यंत निर्णय आला नाही तर सोमवारी (दि. ५) कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचा, या मुद्द्यावर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन तसेच सर्वच व्यापारी ठाम आहेत. व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा, यासाठी कोपरा सभा आयोजित केली असून, ह्या कोपरा सभेत व्यापारी आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी होणार आहेत.