आजरा : येथील सुयश शिक्षक शिक्षण संस्थेच्यावतीने गेल्या २० वर्षांपासून गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात येत असून, ही सत्काराची परंपरा शिक्षकांना प्रेरणा देणारी व तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचाविणारी आहे, असे गौरवोदगार आजरा पंचायत समितीचे सभापती उदयराज पवार यांनी काढले.
आजऱ्यातील सुयश शिक्षक शिक्षण संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रातील गुणवंत शिक्षक, आदर्श शिक्षक व समृद्ध शाळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.
सुयश आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. मारुती डेळेकर व मंगल पाटील यांना देण्यात आला. डॉ. जे. पी. नाईक माझी समृद्ध शाळा पुरस्काराने वरिष्ठ गटात अनुक्रमे पेरणोली, बेलेवाडी, देवर्डे, तर कनिष्ठ गटात बोलकेवाडी, सुलगाव, शृंरगारवाडी या शाळांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सुयशचे अध्यक्ष पांडुरंग आजगेकर, पं. स. सदस्य शिरीष देसाई, शिक्षक बँक अध्यक्ष प्रशांत पोतदार, उपाध्यक्ष अरुण पाटील, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, तालुकाध्यक्ष मायकेल फर्नांडिस, सुयशचे संस्थापक जनार्दन नेऊंगरे, पं. स. सदस्या रचना होलम, विस्तार अधिकारी सुनित चंद्रमणी, रामतीर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष तुकाराम शिणगारे, शिवाजी बोलके, सुभाष चौगुले, संजय शिवणे उपस्थित होते.
* फोटो : क्रमांक : ११०२२०२१-गड-०६
ओळी :
सुयश आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन डॉ. मारुती डेळेकर यांचा सत्कार करताना सभापती उदयराज पवार. शेजारी संभाजी बापट, जनार्दन निऊंगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.