कोल्हापूर : नऊवारी आणि काळ्या रंगाच्या साडीतील युवती आणि कुर्ता, पायजमा, कोल्हापुरी फेटा परिधान केलेले युवक, पारंपारिक वाद्यांचा गजर आणि ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’चे आवाहन अशा उत्साही वातावरणात शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये बुधवारी मकर संक्रांतीचा सण साजरा झाला. युवक-युवतींनी पारंपारिक वेशभूषेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवित जल्लोष केला.येथील डीआरके कॉमर्स कॉलेजमध्ये मकर संक्रांतीनिमित्त साडी डे आणि फेटा डे आयोजित केला होता. पारंपारिक वेशभूषा करून सकाळी आठ वाजल्यापासून युवक-युवती या कॉलेजमध्ये येऊ लागल्या. नऊवारी, सहावारी रंगीबेरंगी साड्या नेसून विद्यार्थीनी आल्या होत्या. कुर्ता, पायजमा आणि फेटा परिधान करून आणि गॉगल घालून विद्यार्थी आले होते.
विद्यार्थीनींच्या काही ग्रुपनी वेगवेगळ्या डिझाईनच्या काळ्या साड्या नेसल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी काळा शर्ट आणि पांढरी लुंगी असा दक्षिण भारतातील वेशभूषा केली होती. बी. कॉम. भाग एक अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अरुण यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कॉलेजच्या प्रांगणात मर्दानी खेळ सादर केले. हलगी-घुमकं आणि खैताळ या पारंपारिक वाद्याच्या गजरात तरुणाईने येथे नृत्याचा ठेका धरत जल्लोष केला.
महावीर महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी पारंपारिक वेशभूषा केली होती. काही विद्यार्थ्यांनी हेल्पर्स आॅफ दि हॅण्डीकॅप्ड संस्थेतून महाविद्यालयात येणाºया दिव्यांग विद्यार्थ्यांना तिळगुळ देत त्यांच्याबरोबर मकर संक्रांत साजरी केली. शहाजी कॉलेज, राजाराम कॉलेजमध्ये तरुणाई पारंपारिक वेशभूषा करुन आली होती.
या महाविद्यालयांमध्ये अनेक युवक-युवती आपआपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत ‘सेल्फी’ घेत आनंद व्यक्त करत होते. हे सेल्फी, एकत्रित घेतलेली छायाचित्र लगेचच अनेकांनी सोशल मिडियावर शेअर केली, स्टेटस् आणि डीपींवर लावली. दुपारी एक वाजेपर्यंत महाविद्यालयांच्या परिसर तरुणाईच्या गर्दीने फुलला होता. ज्या महाविद्यालयांमध्ये पारंपारिक वेशभूषा दिन अथवा मकर संक्रांतीचा कार्यक्रम नव्हता तेथील युवक-युवतींनी अन्य महाविद्यालयात जावून तेथील आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटून शुभेच्छा दिल्या.