-शिरोली--सतीश पाटील
लाॅकडाऊन उठल्यावर उद्योजकांच्यावर परप्रांतीय कामगारांना थांबवण्याचे नवीन संकट उभ राहणार आहे. कोरोनाच्या भितीने जिल्ह्यातील परप्रांतीय कामगार परत गावी जाण्याच्या मार्गावर आहेत. कोरोना मुळे संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे.भारतात ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात ऑटोमोबाईल आणि फौंड्री उद्योग मोठा आहे. शिरोली गोकुळ शिरगांव, कागल या ठिकाणच्या फौंड्री उद्योगात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. हे कामगार उत्तरप्रदेश,बिहार,कर्नाटक, पश्चिम बंगाल, उडीसा, झारखंड, मध्यप्रदेश येथील आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या कामगारांच्या घरातील लोक काळजीत पडले आहेत. लाॅकडाऊन उठल्यावर तात्काळ रेल्वे अथवा इतर गाड्या पकडन गावी या असे या कामगारांना घरचे लोक फोन करून बोलवत आहेत. कोल्हापूर मधील उद्योगात परप्रांतीय कामगारांचा आकडा २० हजारहून अधिक आहे. हे कामगार फौंड्रीत मोल्डींग,फेटलींग,रस ओतण्याचे काम,मशिनशाॅप मध्ये अवघड काम करतात आणि लाॅकडाऊन उठल्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामगार घरी गेले तर कामगार आणायचे कुठून हा प्रश्न उद्योजकांना पडला आहे.
यासाठी या कामगारांची जेवणाची, खाण्या पिण्याची, पैशांची खबरदारी उद्योजकांनी घ्यायला सुरुवात केली आहे. लागेल ती मदत देतो पण तुम्ही जाऊ नका. आपल कोल्हापूर हे चांगलं आहे. या ठिकाणी कोणताही धोका नाही तुमची काळजी आम्ही घेतो.असे सांगुन कामगरांच्या घरच्यांना ही फोन वरून समजावत आहेत. पण तरीही लाॅकडाऊन उठल्यावर जर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार गावी गेले तर स्थानिक ऑटोमोबाईल आणि फौंड्री उद्योग पुन्हा संकटात येणार.
लाॅकडाऊन उठल्यावर परप्रांतीय कामगार गावी गेले तर फौंड्री उद्योग अडचणीत येईल यासाठी स्मॅक आणि इतर औद्योगिक संघटनांनी या कामगारांचे प्रबोधन, मनधरणी करण्याचे ठरवले आहे.स्थानिक कामगारांना सुद्धा सर्व सुविधा देण्याचे ठरवले आहे. (स्मॅक अध्यक्ष - अतुल पाटील)
परप्रांतीय कामगार कोल्हापूर मध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. हे कामगार लाॅकडाऊन उठल्यावर जर गावी गेले तर पुन्हा लवकर हे कामगार येतील का हे माहिती नाही.कामगारांची पोकळी निर्माण होईल आणि पुन्हा काम सुरू करताना उद्योगां समोर अडचणी निर्माण होतील.(फौंड्री उद्योजक-निरज झंवर)
स्थानिक आणि परप्रांतीय कामगारांनी लाॅकडाऊन नंतर गावी जाऊ नये. कामगार गावाला गेले तर फौंड्री उद्योग अडचणीत येईल. कामगारांनी उद्योजकांना आणि उद्योजकांनी कामगारांना समजवून घेतले पाहिजे.आणि उद्योग सुरू केले पाहिजे.(काॅ.इम्रान जंगले- जनरल सेक्रेटरी कोल्हापुर जनरल कामगार युनियन लालबवटा)
- उद्योजकांची पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंदकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी बैठक झाली आणि उद्योजकांना लाॅकडाऊनच्या काळात बंद असलेल्या उद्योगांचे विज बिलाचे स्थीर आकार रद्द करावेत.तसेच जीएसटीसह इतर कर भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. अशी मागणी केली. या बैठकीला स्मॅक अध्यक्ष अतुल पाटील, गोशिमा अध्यक्ष सचिन शिरगांवकर,मॅक अध्यक्ष गोरख माळी,राजू पाटील यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.