बाबासाहेब नेर्ले -गांधीनगर --सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तावडे हॉटेल ते रुकडी बंधारा या गांधीनगर बाजारेपेठेच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण सुरूच आहे. त्यातूच वाहतुकीच्या कोंडीमुळे ग्राहक, वाहनधारक, ग्रामस्थ हतबल झाले आहेत. तावडे हॉटेल ते रुकडी बंधारा या प्रमुख मार्गाची रुंदी ६० फूट आहे. या रस्त्यावरच उचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, वळिवडे व चिंचवाड गावांच्या हद्दी आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाढत्या बाजारपेठेमुळे मोठमोठ्या इमारती उभारल्या जात आहेत. संबंधित ग्रामपंचायतींनी बांधकाम परवाने देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा ना हरकत दाखला घेतल्याशिवाय बांधकाम करू नये, अशी अट घातली आहे. काहींनी परवाना घेतला आहे, तर काहींनी ‘दाबून’ बांधकाम पूर्ण केले आहे. काही ठिकाणी ते अद्याप सुरूही आहे. अतिक्रमाणांमुळे रस्त्याच्या प्रारंभी जितकी रुंदी आहे ती पुढे-पुढे अतिक्रमणांमुळे कमी होते. या रस्त्याला रेल्वे स्टेशनकडून येणारा रस्ता जिथे छेदतो, तेथे तर तो २५ फूटही शिल्लक नाही. गांधीनगरच्या मुख्य बसथांब्यावर दोन्ही बाजूला अतिक्रमण झालेले दिसते. केएमटीच्या मुख्य बस थांब्याच्या बांधकामाला अतिक्रमणाच्या तक्रारीवरूनच न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे. के.एम.टी. प्रशासनाच्या अतिक्रमित बांधकामाच्या विरोधात येथील सामाजिक संस्था, कार्यकर्ते, टपरीधारक न्यायालयात गेले आहेत. प्रशासनातर्फे येथील रस्त्याच्या रुंदीची मोजणीही झाली आहे. त्याचा अहवाल न्यायालयाला किंवा केएमटी प्रशासनाच्या विरोधात लढणाऱ्यांना मिळाल्यानंतर अतिक्रमणाबाबत स्पष्टीकरण होणार आहे. मात्र, येथे वस्तुस्थिती पाहता ६० फुटी रस्ता येथे नाही, हे मात्र नक्की. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण झाल्याने वाहतुकीचा प्रश्न वाहनचालक, ग्राहक, ग्रामस्थांना सतावत असतो. चिंचवाडच्या दिशेने जाणाऱ्या या रस्त्यावर वाहतुकीच्या कोंडीमुळे वारंवार अपघात होत आहेत. या कोंडीतून माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, माजी वनमंत्री पतंगराव कदम व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हेही सुटू शकले नाहीत. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी या कोंडीबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी व उद्योजकांची याप्रश्नी बैठक घेतली. व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानापुढे होणारे अतिक्रमण काढून घेण्याची कबुलीही दिली. सम-विषम वाहन पार्किंगचे फलकही लावण्याचे ठरले. एकेरी मार्ग कोणता करायचा हेही निश्चित करण्यात आले. त्यात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत अवजड वाहनांवर प्रतिबंध करण्यात आला. या सर्व उपाययोजनांसाठी ग्रामपंचायती, बँका व काही व्यक्तींकडून अर्थपुरवठाही पोलिसांकडे करण्यात आला; पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले. काही सामाजिक कार्यकर्ते या रस्त्यावरील अतिक्रमणप्रश्नी न्यायालयात गेले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र अतिक्रमण दिसत नाही. अतिक्रमण नाही म्हणणे हे उगलेंचे धाडसच म्हणायला हवे. - सतीश यादव, रस्ता बचाव कृती समितीगांधीनगरमधील वाहतुकीच्या कोंडीची कीड नष्ट करण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना व्यापारी, वाहतूक व्यावसायिक, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कृतिशील पाठबळ नाही. केवळ पोलिसांवरच जबाबदारी सोपविणे योग्य नाही.- संभाजी गायकवाड, स. पो. नि. या मार्गावर अतिक्रमण कोठेही नाही : उगलेया रस्त्यावर अतिक्रमण नसल्याचा पुनरुच्चार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महादेव उगले यांनी केला. मात्र, दोन्ही बाजूला दुकानांसमोर जी वाहने उभी राहतात त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वाहतुकीच्या कोंडीबाबत सकारात्मक : महाजन गांधीनगर वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. ती फोडण्यासाठी आम्ही वाहतूक व्यावसायिकांनी नेहमीच सकारात्मक भूमिका बजावली आहे. यासाठी पोलिसांना, व्यापाऱ्यांना आमचे नेहमीच सहकार्य रााहिले आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा यामध्ये लक्ष घालणे जरूरीचे असल्याचे मत गांधीनगर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय महाजन यांनी व्यक्त केले.
गांधीनगरला वाहतुकीची कोंडी फुटेना
By admin | Published: September 21, 2015 10:41 PM