शिरोली: लाखो तेल शेमटी किड्यांनी पंचगंगा नदीवर शनिवारी (दि.२२) रात्री अचानक येऊन पुलावर महामार्ग रोखला. या तेल किड्यांमुळे एक दुचाकी गाडी घसरुन चारचाकी गाडी खाली लांबपर्यंत फरफटत गेली, तर २५ हून अधिक गाड्या घसरुन पडल्या. यामुळे रात्री उशिरापर्यंत महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलावर तेल शेमटी ( मेप्लाय ) कीटकांचे थवेच्या थवे वाहनधारकांसमोर येत असल्याने पंचगंगा पुलावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. मृत कीटकांचा खच पडल्यामुळे पुलावरचा रस्ताही निसरडा बनला होता. परिणामी २५ वाहनधारक घसरून पडले. अनेकांना कसरत करीत पुलावरून वाहने चालवावी लागत होती.
मेप्लाय हे या कीटकाचे शास्त्रीय नाव आहे. मराठीत याला शेमटी माशी असे म्हटले जाते. नदी, नाले, तलाव अशा पाण्यावर वाढणारे व जन्म घेणारे हे जलीय कीटक आहेत. एकावेळी लाखोंच्या संख्येने यांचे थवेच्या थवे बाहेर पडतात. सायंकाळी सूर्यास्तानंतर ते थव्याथव्याने दिसतात. वाहनांचे दिवे व पथदिव्यांकडे ते सर्वाधिक आकर्षित होत असल्याने महामार्गावरील वाहनांच्या उजेडात ते लाखोंच्या संख्येने पुलावर आढळत होते. त्यांचे आयुष्य फक्त सहा ते सात तासांचे असते. त्यामुळे त्यांचा तत्काळ मृत्यू होतो. मृत शेमट्यांचा खच महामार्गावर पडल्याने मोटारसायकल स्लीप होत होत्या. तसेच हे कीटक डोळ्यात जातील या भीतीने अनेक मोटारसायकलींचा पुलावरील वेग मंदावला होता. परिणामी पंचगंगा पुलावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.