कोल्हापूर : शहरात घरफोड्या, चेन स्नॅचिंग, लूटमारीसह मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे, तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत शहरातील महाविद्यालय परिसरासह चौकांत, नाक्यांवर व महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये सुमारे ९०० नियमबाह्य वाहनचालकांवर कारवाई करत, १ लाख ८० हजार रुपये दंडाची वसुली केली.घरफोड्या, चेन स्नॅचिंग, लूटमारीसह दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी ‘ट्रॅफिक ड्राईव्ह’ घेण्याचे आदेश शहरातील पाचही पोलीस ठाण्यांसह शहर वाहतूक शाखेस दिले. त्यानुसार शहरातील पाच पोलीस निरीक्षक, १०० पोलीस कर्मचाऱ्यांची फौज मंगळवारी रस्त्यावर उतरली.
सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत शिवाजी पूल, दसरा चौक, लिशा हॉटेल चौक, सदर बझार, ताराराणी पुतळा, महावीर कॉलेज चौक, मध्यवर्ती बसस्थानक, सायबर चौक, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, गंगावेश, सायबर चौक, जवाहरनगर, फुलेवाडी नाका, कळंबा नाका, वाशी नाका, आर. के. नगर, आदी १५ ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवत प्रत्येक व्यक्तीची, वाहनांची व साहित्याची कसून तपासणी केली.
वाहनांतील गॅसकिटच्या तपासणीसह परवाना, वाहनांची कागदपत्रे,तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली.झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट यासह अन्य फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून फिरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अनिल गुजर, वसंत बाबर, संजय मोरे, मानसिंह खोचे, औदुंबर पाटील यांनी स्वत: रस्त्यावर उभे राहून वाहनांची तपासणी केली.
वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, सोबत योग्य ती कागदपत्रे बाळगावीत व कायदेशीर कारवाई टाळावी.अनिल गुजर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.