सोळांकुर : संततधार पडणाऱ्या पावसामुळे फोंडा घाटात मोरीतील पाईप खचून रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डा निर्माण झाल्याने या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे. त्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर रस्ता सुरू करावा, अशी मागणी अवजड वाहनधारक करत आहेत.देवगड निपाणी राज्य महामार्गावर फोंडा घाटात किमी ६१/७०० या मोरीतील पाईप खचून रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डा निर्माण झाला होता. अवजड वाहनामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहनांना बंदी घालण्यात आली होती. तसेच एकेरी वाहतूक करून काम करणे शक्य नसल्याने गेले तीन दिवस अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. रस्ता बंदचा आदेश येण्यापूर्वी काही वाहने घाटात येऊन अडकली आहेत तर काही वाहने फोंडा, कणकवली महामार्ग व गावात येऊन थांबली आहेत. तर काही राधानगरी, गैबी, फेजिवडे तसे महामार्गावरील पेट्रोल पंपात उभी करण्यात आली आहेत. जवळपास हजारो वाहने या महामार्गावर अडकली आहेत.घाटात दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र आणखीन काही दिवस लागण्याची शक्यता आहे. तीन दिवस वाहने उभी असल्याने वाहनधारकांची चांगलीच कुचंबणा झाली आहे. तसेच त्यांना अन्न, पाणी, डासाचा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी गगनबावडा ही घाट बंद असल्याने वाहन चालकांची दमछाक झाली आहे.
Kolhapur: फोंडा घाटात वाहतूक कोंडी, अवजड वाहनांना बंदीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 4:20 PM