उदगाव : येथील सांगली-कोल्हापूरमहामार्गावरील कृष्णा नदीच्या अंकलीकडील बाजूस असलेल्या मोठ्या पुलाजवळ वादळी वाऱ्याने सहा झाडे पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक ठप्प झाल्याने एस. टी. बसेस व रुग्णवाहिका अडकून पडली होती. अखेर जयसिंगपूर पोलिसांच्या प्रयत्नांनंतर झाडे बाजूला काढून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.गेल्या दोन-तीन दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या पावसाने गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कृष्णा नदीच्या अंकलीकडील बाजूस असलेल्या मोठ्या पुलाजवळ मोठी सहा झाडे पडल्याने सांगली-कोल्हापूरमहामार्ग ठप्प झाला. त्यानंतर उदगाव ते जयसिंगपूर मार्गावर तब्बल सहा किलोमीटर तर सांगलीकडील बाजूला पाच किलोमीटर तर मिरजकडील बाजूस चार किलोमीटर तसेच उदगाव ते तमदलगे बायपास मार्गावर तब्बल जैनापूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.घटनास्थळी पोलिस कॉन्स्टेबल सचिन चौगुले, काशीराम कांबळे, वैभव सूर्यवंशी, गुलाब सनदी, विजय मगदूम, विशाल खाडे यांच्यासह कर्मचारी दाखल होऊन तत्काळ पडलेली झाडे बाजूला केली. त्यानंतर पाचच्या सुमारास जयसिंगपूर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
झाडे कोसळल्याने सांगली-कोल्हापूर मार्गावर वाहतूक कोंडी, दोन ते अडीच तासांनंतर वाहतूक सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 6:39 PM