शिये : पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिये फाटा येथे वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. महामार्गावरून कोल्हापूर शहरात प्रवेशासाठी सोयीचा मार्ग म्हणून शिये फाटा येथे शेकडो वाहने येथून रहदारी करीत असतात. त्यातच आणखी भर म्हणून रस्त्याकडेला असणारे टपऱ्यांचे अतिक्रमण, त्यासमोर होणारे बेशिस्त पार्किंग यामुळे अनेकदा वाहन चालक गोंधळून जातात. रात्रीच्या वेळी येथे पथदिव्यांची सुविधा नसल्याने चालकांची मोठी गैरसोय होते.
महामार्ग चौपदरीकरणात शिये फाटा येथे महामार्ग ओलंडण्यासाठी भुयारी पुलाची निर्मिती करण्यात आली. शिरोली औद्योगिक वसाहत, कसबा बावडा मार्गे कोल्हापूर, जोतिबा डोंगर, पन्हाळा, रत्नागिरी या ठिकाणी जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून शिये फाटा विकसित झाला. सध्या शिये फाटा येथे महामार्गासह पाच रस्ते एकत्र आले आहेत. त्यामुळे कोणत्या दिशेने कोणते वाहन जाणार याचा अंदाज लावणे चालकाला आव्हानात्मक ठरते. सकाळी सात ते दहा व रात्री साडेचार ते नऊ या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असते. किमान या वेळेत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी उपस्थित असणे गरजेचे आहे. शिये फाटा मुख्य चौक ते परमाळ पेट्रोलपंप येथील मुख्य रस्ताकडेला फळ विक्रते, चहा टपऱ्याचे अतिक्रमण झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे.
भविष्यात रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग व प्रस्तावित कोल्हापूर रिंग रोड येथून होणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या विभागातील अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन येथील वाहतूक कोंडी सोडविण्याची गरज आहे.
फोटो ओळ शिये : शिये फाटा येथे एखादा अपघात होण्यापूर्वी होणारी वाहतूक कोंडी संबंधित विभागाने सोडविण्याची गरज आहे. ( फोटो : हरी बुवा )