संदीप बावचे
जयसिंगपूर: शहरातील बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. क्रांती चौकातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी नियोजन करण्यात आले. चार वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला आता शिस्त लागणार आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्गावर वसलेल्या जयसिंगपूर शहरात बाजारपेठ असल्याने आसपासच्या गावातील नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी येतात. शिवाय बसस्थानकावरून ये-जा करणाऱ्या बसेसची संख्यादेखील जास्त आहे. अवजड वाहनांना शहरातून बंदी असतानादेखील सांगली, कोल्हापूरकडे जाणारी अशी वाहने बिनदिक्कतपणे जात आहेत. त्यामुळे क्रांती चौकात वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब बनली आहे.
क्रांती चौकातील कोंडीवर अनेकवेळा प्रयोग झाले आहेत. शिवाय, चारही दिशेला बॅरिकेड्स लावून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वेगाला आळा घालण्यात आला होता. ही मोहीम काही काळच चालली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यामुळे पुन्हा वाहनांची गर्दी वाढली आहे.
नो-एंट्रीतून अनेक वाहने सुसाटपणे जात आहेत. क्रांती चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने एकऐवजी आता चार जणांची वाहतूक पोलीस म्हणून नियुक्ती केली आहे. उदगाव टोलनाक्याबरोबरच क्रांती चौकातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन केले आहे.
वाहनांवर दंडात्मक कारवाई
क्रांती चौकात बेशिस्तपणे अनेक वाहने उभी केली जातात. अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शिवाय वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. उदगाव व तमदलगे येथे अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदीचे फलक लावण्यात येणार आहेत.
कोट - क्रांती चौकातील वाहतूक कोंडीबरोबरच अन्य ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जादा वाहतूक पोलिसांची नेमणूक केली आहे. ही मोहीम व्यापकपणे राबविली जाईल.
- राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक
फोटो - ०१०९२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील क्रांती चौकात वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन केले जात आहे.