कोल्हापूर : लक्ष्मीपुरी कोंडा ओळ चौकात गुरुवारी दुपारी रस्त्यावर पार्किंग केलेली कार बाजूला घेण्यास सांगणाऱ्या दोघा वाहतूक पोलिसांना तरुणाने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. भररस्त्यात हा प्रकार पाहून नागरिकांनी गर्दी केली. यावेळी त्याने व त्याच्या मित्राने पोलिसांच्या समोरच जॅमर लावलेले चाक निखळून त्याठिकाणी दुसरे चाक लावून तेथून पळ काढला.याप्रकरणी वाहतूक पोलीस मारुती लक्ष्मण शिंदे (वय ३९, रा. खुपिरे पैकी शिंदेवाडी, ता. करवीर) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी संशयित आरोपी अरोण सदाशिव भोसले (२१, रा. कनाननगर, नागाळा पार्क), त्याचे वडील सदाशिव आण्णाप्पा भोसले (६५), त्याचा मित्र (नाव, पत्ता माहीत नाही) या तिघांवर सरकारी कामात अडथळा व जॅमर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित दोघांचा शोध सुरू असून, याप्रकरणी त्यांना अटक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोंडा ओळ चौकात बुधवारी वाहतूक पोलीस मारुती शिंदे हे बंदोबस्तास होते. दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौक ते उमा टॉकीज रोडवरील एका दुकानासमोर कार (एमएच ०२ एलए-३१५४) रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत संशयित अरोण भोसले याने उभी केली. शिंदे यांनी त्याला तेथून गाडी काढण्यास सांगितले असता त्याने व मित्राने हुज्जत घालत गाडी काढणार नाही, तुला काय करायचे ते कर, तुला सोडणार नाही, अशी धमकी देत शिवीगाळ करत मोबाईलच्या दुकानात गेले. शिंदे यांनी वाहतूक शाखेस फोन करून क्रेन व जॅमर पाठविण्यास सांगितले. काही क्षणांतच वाहतूक पोलीस संजय रंगराव जाधव हे घटनास्थळी आले. त्यांनी त्या कारच्या चाकाला जॅमर लावला. हे पाहून अरोण व मित्र दुकानातून धावत येत शिंदे व जाधव यांच्या अंगावर गेले. त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून नागरिकांनी गर्दी केल्याने तणाव पसरला. गर्दी झालेले पाहून अरोणला चांगलाच ताव चढला. त्याने थेट गाडीतून स्टेपनी काढून जॅमर लावलेले चाक निखळले. त्याठिकाणी दुसरे चाक (स्टेपनी) जोडून जॅमर लावलेले चाक गाडीत टाकून तो मित्रासह तेथून निघून गेला.दरम्यान, या प्रकाराची माहिती त्याच्या वडिलांना समजताच ते या ठिकाणी आले. त्यांनी महिला कॉन्स्टेबलनादेखील अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. वातावरण चांगलेच चिघळल्याने लक्ष्मीपुरी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी वाद घालणाऱ्या सदाशिव भोसले यांना गाडीतून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी बाप-लेकासह तिघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.अधिकाऱ्यांसह बघून घेण्याची धमकीसंशयित अरोणने कारचा सायलेन्सर काढून टाकला होता. त्यामुळे गाडी रस्त्यावरून जाताना मोठा आवाज होत असे. त्यामुळे वाहतूक शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी गाडी जप्त केली होती. त्याचा राग मनात धरून त्याने खुणे यांचे नाव घेऊन शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकाराची माहिती समजताच खुणे व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आले. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्याशी चर्चा करून निघून गेले.डोक्यात रॉड घालण्याची धमकी शहर वाहतूक शाखेचे पोलीस मारुती शिंदे व संजय जाधव हे अरोण भोसले याला जामर काढू नकोस, असे सांगत होते. यावेळी त्याने अंगाला हात लावलात तर डोक्यात रॉड घालीन, अशी धमकी दिली.
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की
By admin | Published: August 14, 2015 12:53 AM