संदीप बावचे ---जयसिंगपूर सार्वजनिक वितरण व्यवस्थेत शासनाने आणखी सकारात्मक पाऊल टाकले आहे. शासनाच्या अनुदानाचा खऱ्या अर्थाने गरजू व पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळावा, यासाठी रेशन दुकानांमधून आता पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य मिळणार आहे. शिरोळ तालुक्यात १३८ दुकानांसाठी ही मशीन उपलब्ध झाली असून, येत्या १७ एप्रिलला अंतिम प्रशिक्षण दुकानदारांना दिले जाणार आहे. त्यानंतर १८ एप्रिलला तालुक्यातील सर्वच दुकानांत पॉस मशीन बसणार आहेत. त्यामुळे आता हाताच्या अंगठ्याच्या ठशाद्वारे (थंब) यापुढे रेशनचे धान्य मिळणार आहे. संपूर्ण देशभरात कॅशलेस अर्थव्यवस्था राबविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. ग्रामीण भागात निगडित असलेला सामान्यवर्ग हा जास्त करून रेशन दुकानदारांच्या माध्यमातून जवळचा असल्याने केंद्र शासनाने व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून रेशन दुकानदारांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था आणखी सुरळीत होण्यासाठी रेशन दुकानांमधून पॉस मशीनच्या माध्यमातून लोकांना धान्य देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तालुक्यातील रेशनकार्डचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तालुक्यातील १३८ रेशन दुकानांमध्ये ही पॉस मशीन देण्यात येणार आहेत. रेशनकार्डधारकांना अंगठ्याच्या ठशावर यापुढे आता धान्य मिळणार आहे. सोमवारी (दि.१७) सर्व रेशन दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वच दुकानांतून या पॉस मशीनद्वारे दुकानांचे व्यवहार सुरू होणार आहेत. भविष्यात : कॅशलेस व्यवहारग्रामीण भागात कॅशलेस व्यवहारास चालना देण्यासाठी केंद्र शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये पाऊल उचलले होते. कॅशलेसला चालना देण्यासाठी व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून रेशन दुकानदारांची नेमणूक करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. शिरोळ तालुक्यातील जवळपास १३८ धान्य दुकानांत पॉस मशीन बसविली जाणार आहेत. या मशीनमध्ये कॅशलेस व्यवहार प्रणालीचीदेखील सोय उपलब्ध करण्यात आली आहे. सध्यातरी एकूणच आॅनलाईनद्वारे रेशन दुकानांतील व्यवहारांची नोंद होणार आहे.
प्रशिक्षण १७ एप्रिलला : १८ एप्रिलपासून थंबद्वारे मिळणार धान्य
By admin | Published: April 13, 2017 11:41 PM