कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी सकाळी कोल्हापुरातील विविध संस्थांनी प्रात्यक्षिके, प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. त्यात काही संस्था कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन उपक्रम राबविणार आहेत.
शिवाजी विद्यापीठातील योग केंद्राच्या वतीने सोमवारी सकाळी सात ते आठ वाजेदरम्यान ऑनलाइन योग वर्ग प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. त्याचा विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक आदींनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागातर्फे संचालक डाॅ. आर. व्ही. गुरव यांनी केले आहे. महापालिकेतील भाजप आणि ताराराणी आघाडीच्या वतीने शहरात विविध दहा ठिकाणी योगा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी सात ते नऊ यावेळेत दुर्गामाता मंदिर हॉल (जोशी गल्ली, शुक्रवार पेठ), आत्मदर्शन केंद्र (युथ बँकेच्या वर, व्हिनस कॉर्नर), फ्रेंडशिप कॉम्प्युटर क्लास (साईमंदिराजवळ, फुलेवाडी), आर. एस. एस. केंद्र (कसबा बावडा), टेंबलाई मंदिर येथील हॉल, शिवस्वरूप अपार्टमेंट (टिंबर मार्केटजवळ), गणेश हॉल (दैवज्ञ बोर्डिंगजवळ, मंगळवार पेठ), इंद्रप्रस्थ हॉल (लकी बाजारवर, राजारामपुरी), हिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी हॉल (रुईकर कॉलनी), इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल (जयप्रभा स्टुडिओजवळ) याठिकाणी शिबिर होणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले आहे.
चौकट
जलयोगाची प्रात्यक्षिके
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सकाळी सात ते नऊ यावेळेत ऑनलाइन सामान्य योग अभ्यासक्रम व जलयोगाची प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत. त्यामध्ये सामान्य योगाची प्रात्यक्षिके राष्ट्रीय योगपटू गार्गी भट, तर जलयोगाची प्रात्यक्षिके अमर पाटील सादर करणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली.