लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या मतदानाची तयारी निवडणूक यंत्रणेने सुरू केली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण झाले असून मतपत्रिका छपाईचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा भाग म्हणून ३५ मतदान केंद्रे ही मोठ्या शाळा, महाविद्यालयांत निश्चित केली जाणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने ‘गोकुळ’ची निवडणूक घेण्याची जोखीम आहे. निवडणुकीचा वाद सर्वेाच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. त्यावर सोमवारी (दि. २६) सुनावणी होणार असून न्यायालयाने राज्य सरकारला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालय स्थगिती देणार की निवडणूक होणार, हे अद्याप निश्चित नसले तरी, निवडणूक यंत्रणेने आपली तयारी सुरू केली आहे. २ मे रोजी जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर मतदान होत आहे. त्यासाठी तालुक्यातील मोठ्या शाळा, महाविद्यालयांची निवड केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता राहावी, म्हणून प्रयत्न सुरू आहेत.
मतदानासाठी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. तहसीलदारांच्या पातळीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी
‘गोकुळ’ची ४ मे रोजी मतमोजणी होत आहे. मतदान केंद्रे निश्चित केली असून मतमोजणी रमणमळा, कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे होणार आहे.