लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने जनावरांसाठी आयुर्वेदिक औषधोपचाराचा उपक्रम राबविला आहे. या अनुषंगाने स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते गुरुवारी ताराबाई पार्क येथील कार्यालयात झाले.
आनंदराव पाटील चुयेकर प्रशिक्षण केंद्रामार्फत आर. बी. पी. स्वयंसेवकांना देण्यात येणारे हे प्रशिक्षण दोन दिवस चालणार आहे. यामध्ये जनावरांच्या आजारांमधील आयुर्वेदिक उपचार पध्दतीचे महत्त्व व त्याची उपयोगिता, हर्बल गार्डन व्हिजिट व आयुर्वेदिक औषधोपचारामध्ये उपयोगी येणाऱ्या वनस्पती व पदार्थांची ओळख व त्यांचे गुणधर्म, प्राथमिक आयुर्वेदिक औषधोपचारांमध्ये केंद्रामध्ये स्वयंसेवकांना जबाबदारी व कार्यपध्दती, जनावरांचे आजार व त्यासाठी वापरण्यात येणारी उपचार पध्दती अशा अनेक विषयावर मार्गदर्शन होणार आहे. प्रास्ताविक पशुसंवर्धन विभागाचे व्यवस्थापक डॉ. यु. व्ही. मोगले यांनी केले. डॉ. विजय मगरे यांनी आभार मानले. यावेळी सहाय्यक व्यवस्थापक डॉ. पी. जे. सोळुके यांच्यासह ‘गोकुळ’च्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो: १५०७२०२१-कोल-गोकुळ
फोटो ओळ : गोकुळ दूध संघातर्फे जनावरांना आयुर्वेदिक औषधोपचार होणार आहेत. त्या अनुषंगाने स्वयंसेवकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे गुरुवारी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.