लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज, रविवारपासून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मेपर्यंत समितीमधील शेतीमालाचे सौदे ठप्प राहणार आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री १२ पासून कडक लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. बाजार समितीमध्ये शेतीमालाच्या सौद्यावेळी मोठी गर्दी होते. त्यातून संसर्ग वाढण्याचा धोक अधिक असतो. प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने आठ दिवस बाजार समितीमधील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, धान्य, गूळ यासह इतर विभाग बंद राहणार आहेत. समिती प्रशासनातील प्रमुख अधिकारी व सुरक्षा रक्षक हेच कामावर येणार आहेत.
याबाबत, शनिवारी सकाळी सर्व विभागाचे अडते, व्यापारी, शेतकरी, समितीचे अधिकारी यांची बैठक झाली. यामध्ये जिल्हा प्रशासनाने दिलेला आदेश व कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील दक्षता याबाबत चर्चा झाली. त्यानुसार शनिवारी मध्यरात्रीपासून समितीचे कामकाज पूर्णपणे बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना याची माहिती देण्याची सूचना समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी संबंधितांना दिली.
कोट-
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू होतोय. त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीमधील सर्व विभागातील कामकाज बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अमर शिंदे (जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर).