कोल्हापूर : आंतरजिल्हा बदली झालेल्या ४९ शिक्षकांपैकी ४० शिक्षकांना कार्यमुक्त करताना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना माहितीच दिली नसल्याने जिल्हा परिषदेत या मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. स्वत: यादव यांनीच याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. यादव यांनी याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना जाब विचारल्याचे समजते. तसेच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचीही भेट घेतली.कोल्हापूर जिल्ह्यात येणारे शिक्षक अजूनही जिल्ह्यात हजर झालेले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा जरी बंद असल्या तरी अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षक हजर झाल्यानंतर या ४९ शिक्षकांना सोडावे, अशी भूमिका घेतली जाते. बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनीही याबाबत पत्र दिले होते.या सर्व पार्श्वभूमीवर सभापती यादव यांना कल्पना न देताच या ४० शिक्षकांच्या बदलीची फाईल प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठवली.
त्यांनीही या शिक्षकांच्या बदल्यांच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानंतर संबंधित शिक्षकांना सोडण्याचे आदेश तालुक्यांना प्राप्त झाल्यानंतर अनेक सभापतींनी शिक्षण सभापतींकडे चौकशी सुरू केली. मग मात्र यादव यांनी उबाळे यांना बोलावून याबाबत आपल्याला कल्पना का दिली नाही याचा जाब विचारला.पर्यायी व्यवस्था काय केली ?शिक्षण समितीला विश्वासात न घेता हा निर्णय घेताना पर्यायी व्यवस्था काय केली असा सवाल शिक्षण सभापती यादव यांनी पत्रकाव्दारे उपस्थित केला आहे. शिक्षण समितीची सभा होणार असून त्यामध्येही या विषयावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच शिंगणापूर येथील क्रीडा प्रशालेच्या जागेवर खासगी कुस्ती प्रशिक्षण देण्याचा मुद्दाही यावेळी चर्चेत येणार आहे.