कोल्हापूर : सोमवार वेळ दुपारी दोनची...बिंदू चौक सबजेल ते भवानी मंडपाकडे जाण्यासाठी नागरिकांची वर्दळ सुरू होती. अचानक सबजेलला लागून असलेल्या विद्युत खांबावरील ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट होऊन आग लागून धुराचे लोट बाहेर पडू लागले. विद्युत खांबाच्या खाली आसपास उभे असलेले नागरिक भीतीने सैरावैरा पळत सुटले. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविल्यानंतर धोका टळला. शॉर्टसर्किटने स्फोट होऊन आग लागल्याचे जवानांनी सांगितले.अधिक माहिती अशी, बिंदू चौकात ‘महावितरण’चा विद्युत ट्रान्स्फॉर्मर आहे. दुपारी दोनच्या सुमारास अचानक ट्रान्स्फॉर्मरमधून स्फोट झाल्यासारखा आवाज होऊन आग लागून धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्याच्या आवाजाने लोक जीवाच्या भीतीने सैरावैरा पळत सुटले. या प्रकाराची माहिती हाकेच्या अंतरावरील अग्निशामक दलास दिली. जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्युत खांब असल्याने त्याच्यावर पाणी मारणे धोकादायक होते; त्यामुळे ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. विजेचा खांब असल्याने त्याच्या आजूबाजूच्या परिसरात ये-जा करण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आल्याने गोंधळ उडाला.लक्ष्मीपुरी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुकीवर नियंत्रण ठेवले. परिसरातील वीजपुरवठा बंद केल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी ड्राय केमिकल पावडर आणि पाण्याचा मारा करून आग विझवली.
बिंदू चौकात ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट; नागरिकांची पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 12:19 AM