कोल्हापूर : येथील ‘दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमध्ये अभिजात कलेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या चित्रकारांचे राष्ट्रीय पातळीवरील ‘संक्रमण’ प्रदर्शन बुधवारपासून सुरू झाले. या कलावंतांनी दिल्लीत प्रदर्शन भरवून आपल्या ज्ञानाच्या कक्षा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रदर्शन ललित कला अकादमी, नवी दिल्ली येथे १२ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. या चित्रप्रदर्शनाद्वारे ‘वास्तववादी ते अमूर्त’ या दरम्यानचा प्रवास सुरेख पद्धतीने मांडला आहे.प्रतीक्षा व्हनबट्टे ,पुष्पक पांढरबळे, आकाश झेंडे, दुर्गा आजगावकर, अनिशा पिसाळ, अभिषेक संत आणि शुभम भिकाजी चेचर यांनी रेखाटलेल्या चित्रांचे हे प्रदर्शन आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी शिल्पकार सुतार म्हणाले, ‘निसर्गातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
सर्वसामान्य लोक जे पाहू शकत नाहीत ते चित्रांतून मांडण्याचा प्रयत्न तुम्ही करीत आहात, याचा आनंद वाटला. कलानिर्मितीसाठी निसर्ग हाच मोठा शिक्षक आहे.’ खासदार महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूरच्या या सात युवा कलाकारांची आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती पाहून आपल्या कोल्हापूरची कला दिल्लीत पोहोचल्याचा अभिमान वाटतो.’ यावेळी ललित कला अकादमीचे पदाधिकारी, सर्व सहभागी कलाकार व कलारसिक उपस्थित होते.