कोल्हापूर : मायबोली मराठीत आज इस्लाम धर्मातील विविध साहित्याची भर पडत आहे; पण मोलाची भर घालण्याचे काम कोल्हापुरातून झाले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. इस्लाम धर्मातील अरबी भाषेतील पवित्र ग्रंथ ‘कुरआन शरीफ’चे प्रथम पूर्ण मराठीत भाषांतराचे काम पैगंबरवासी प्रा. कुतबुद्दीन हुसैन मणियार, मुबारक मणियार, अब्दुल जब्बार कुरेशी यांनी बावीस वर्षांपूर्वी मार्गी लावले.परिणामी, आज मराठीत ‘दिव्य कुरआन’ उपलब्ध झाले आहे. याचा उपयोग मुस्लिम बांधवांसोबत अभ्यासक, अन्य धर्मीयांकडून होत आहे. ही बाब कोल्हापूरकरांच्या दृष्टीने भूषणावह म्हणावी लागेल. महाराष्ट्राला मराठी भाषेचा खूप अभिमान आहे. तसेच भारतातील सर्वच मुस्लिम बांधवांना उर्दू येत नाही. यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची इच्छा होती की, पवित्र ‘कुरआन शरीफ’चे मराठी भाषेत भाषांतर व्हावे. यासाठी ते प्रयत्नशील होते. काहींनी प्रयत्नही केले; पण त्यांना पूर्ण यश आले नाही. तब्बल ९0 वर्षांनंतर ‘दिव्य कुरआन’चे मराठीत भाषांतर प्रा. कुतबुद्दीन मणियार, मुबारक मणियार, अब्दुल कुरेशी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. विशेष म्हणजे भारतातील दारूल उलम देवबंद जिल्हा सहारनपूर उत्तरप्रदेश यांचा कुरआन मरासिलाती कोर्स या परीक्षेत १९७७ मध्ये प्रा. कुतबुद्दीन मणियार प्रथम आले होते. त्यांना कुरआनचे भाषांतर करण्याचे या परीक्षेद्वारे विधीवत प्रमाणपत्र मिळाले होते. हे दिव्य काम पार पाडण्यासाठी त्यांना सात वर्षे कठोर परिश्रम घ्यावी लागली. मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी यांच्या मूळ विश्वविख्यात ‘तर्जुमा-ए-कुरआन’चे ‘दिव्य कुरआन’ हे मराठीत भाषांतर आहे. या भाषांतरात अरबी भाषेतील मूळ कुरआनशी सर्वार्थांनी प्रामाणिक व सुसंगत राखण्याचा आटोकाट प्रयत्न झाला आहे. तसेच या सर्व ‘कुरआन शरीफ’चे सार सांगणाऱ्या शेवटच्या अध्यायाचे भाषांतर केले आहे. ‘दिव्य कुरआन’ या भाषांतरित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ९ आॅक्टोबर १९९२ रोजी झाला होता. आज ‘दिव्य कुरआन’च्या प्रती ‘इस्लामिक मराठी पब्लिकेशन’तर्फे प्रकाशित होत आहेत. (प्रतिनिधी)
भाषांतरित ‘दिव्य कुरआन’ कोल्हापूरकरांसाठी भूषणावह
By admin | Published: July 25, 2014 11:52 PM