कोल्हापूर: शासकीय यंत्रणेच्या चांगल्या कामास पारदर्शकतेने बळ मिळते, त्यात मध्यस्थांचा शिरकाव होऊ दिला नाही तर यंत्रणेवर लोकांचा विश्वास वाढतो. जिल्ह्यातील महसूल यंत्रणाही याच दिशेने काम करत आहे. हे मागील काही कालावधीत याच यंत्रणेने निस्पृह रित्या काम करून सिद्ध केले आहे. याच पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन पुढचेही काम सुरू राहील अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
पारदर्शकता हाच महसूल लोकजत्रेचा मुख्य गाभा असून त्यात मध्यस्थाना थारा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एखादा कर्मचारी किंवा व्यक्ती चुकीची वागली म्हणून सगळीच यंत्रणा दोषी ठरविणे हे चुकीचे आहे.कोल्हापूरचे महसूल किंवा एकूणच प्रशासन असेल, त्यांनी सर्वच शासकीय मोहिमेमध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. गतवर्षी आलेला महापूर, यंदाचे कोरोना संसर्गामध्ये जिल्हा प्रशासनाने उत्तम काम करून दाखवले. त्याप्रमाणे महसूलची प्रलंबित कामे करून हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची मालकी देण्याचे काम करण्यात याच यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये त्याचे नेतृत्व जिल्हाधिकारी करत असले तरी काम करणारे सर्व हेच कर्मचारी आहेत.
लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीतही हीच यंत्रणा उत्तम पद्धतीने राबत असते. त्यामुळेच प्रशासनाचा गाडा उत्तम पद्धतीने चालतो. शिपायापासून अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येक घटक आपापले उतोमात्तम योगदान देत असतो. या सामूहिक प्रयत्नातूनच कोणतीही मोहीम किंवा चांगले काम आकाराला येते, त्यामुळे त्याबद्धल या यंत्रणेचे कौतुकच केले पाहिजे.महसूल लोक जत्रेतही ही यंत्रणा तेवढ्याच उत्साहाने सहभागी होत आहे. नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व सहकार्य करावे असे आवाहन देसाई यांनी केले आहे.