कुरुंदवाड : शिरढोण-कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील पंचगंगा पूल अवजड वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे. त्यामुळे अवजड वाहनास बंदी असल्याचा फलक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आला आहे. या मार्गावरून एस.टी.बस वाहतूक बंद असली तरी वाळूचे ट्रक राजरोसपणे चालू आहेत. त्यामुळे सावित्री पुलाप्रमाणे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. शिरढोण-कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंंगा नदीवरील पुलाचे काम मुळातच निकृष्ट आणि नियोजनशून्य झाले आहे. रस्त्यापेक्षा पुलाची उंची खूपच कमी असल्याने पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली जातो. पुलाचे बुरुजाचे काम निकृष्ट झाले असून, अवघ्या पुलाच्या ३० ते ३२ वर्षांच्या वयातच बुरुजाचे दगड ढासळत आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील पूल अशाच दुर्लक्षाने अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे राज्यातील सर्व जुन्या पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये हा पंचगंगा पूल अवजड वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचा अहवाल येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूस पुलावरून अवजड वाहनास बंदी असल्याचा फलक लावण्यात आला आहे. या आदेशामुळे या मार्गावरून एस.टी. वाहतूक बंद केल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. मात्र, ट्रक, ट्रॅक्टर, प्रमाणबाह्य वाळू भरून वाळूचे ट्रक राजरोसपणे चालू आहेत. त्यामुळे या अवजड वाहनामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ फलक लावून जबाबदारी संपते काय? असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत असून, या विभागाने पुलाची दुरुस्ती होईपर्यंत पहारेकरी ठेवावा, अशी मागणीही होत आहे. (वार्ताहर)
बंदी असूनही अवजड वाहनांची वाहतूक
By admin | Published: March 28, 2017 12:08 AM