कोल्हापूर : सरपणाच्या पोत्यांखाली लपवून ७० लाख ८० हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. ही कारवाई ओसरगाव (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे बुधवारी (दि. १) सकाळी झाली. ट्रकचालक लक्ष्मण अर्जुन ढेकळे (वय ३४, रा. सुपने, ता. कराड, जि. सातारा) याला पथकाने अटक केली. कोकणात सलग दोन दिवस विभागीय भरारी पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत एक कोटी ४३ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली.गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक कणकवलीमार्गे होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार अधिका-यांनी बुधवारी पहाटे कणकवली तालुक्यात सापळा लावला होता. ओसरगाव येथे संशयित वाहनांची झडती घेताना एका ट्रकमध्ये सरपणाची पोती आढळली. पोती हटवल्यानंतर त्याखाली गोवा बनावटीच्या दारूचे ११५२ बॉक्स लपवल्याचे निदर्शनास आले. पथकाने ट्रकचालक लक्ष्मण ढेकळे याला अटक करून ७० लाख ८० हजार ३६० रुपयांचा दारूसाठा आणि ५५ लाखांचा ट्रक असा एक कोटी २६ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक कुंभार यांच्यासह दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, योगेश शेलार, राहुल सपकाळ यांच्या पथकाने कारवाई केली.
Kolhapur: सरपणाच्या पोत्यांखालून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक, सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त
By उद्धव गोडसे | Published: November 01, 2023 4:16 PM