इचलकरंजी : शहर अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सिग्नल, पार्किंग झोन, मुख्य मार्गावरील पार्किंगचे पांढरे पट्टे मारणे यासह रस्त्यावर अतिक्रमण करणार्यांवर दंडात्मक कारवाई करणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय आज (सोमवार) नगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर होत्या. कित्येक वर्षे अंतर्गत वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अवजड वाहनांसाठी रिंंग रोड तयार केले आहेत. मात्र, त्याची दुरवस्था झाली असल्याने त्याचाही बोजा मुख्य मार्गावर होताना दिसत आहे. सिग्नल सुरू नसल्याने चौका-चौकात होणारे अपघात, रस्त्याकडेला पांढरे पट्टे मारले नसल्याने विस्कळीत झालेले पार्किंग व रस्त्यावरच व्यवसायसाठी करण्यात आलेले अतिक्रमण, अशा कारणांमुळे मार्गक्रमण करणार्यांना नेहमीच अडचणी निर्माण होत आहेत. तर कारवाई करताना वाहतूक कर्मचार्यांनाही अडचण येत आहे. या पार्श्वभूमीवर आज नगरपालिकेच्या सभागृहात वाहतूक सल्लागार समिती, नगरसेवक, अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेकांनी याबाबतची आपापली मते स्पष्ट केली. यामध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांबरोबर नगरपालिकेच्या कर्मचार्यांनीही अतिक्रमण, बांधकामाचे रस्त्यावर पडलेले साहित्य याबाबत निर्णय घेऊन तोडगा काढावा. अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चेनंतर वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, वाहतूक नियंत्रण शाखेचे राजू तहसीलदार, शिवाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक अर्चना बोदडे, गटनेते बाळासाहेब कलागते यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार
By admin | Published: May 13, 2014 12:50 AM