मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
आजरा
: तस्करीसाठी आणलेले खवले मांजर आज त्याचा नैसर्गिक अधिवास असलेल्या आजरा तालुक्यातील वन विभागाच्या जंगल परिसरात सोडण्यात आले. गडहिंग्लजचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर आज खवल्या मांजराला हजर केले असता त्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश दिले होते. वन विभागाने मांजर तस्करीप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, सहायक वन संरक्षक एस. बी. बिराजदार व सुनील निकम यांच्यासमोर आज दिवसभर चौकशी सुरू आहे. खवल्या मांजराच्या तस्करीप्रकरणी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथे तस्करीसाठी आणलेले खवले मांजर विक्री व्यवहारावेळी तस्करांनी वन कर्मचाऱ्यांवरती हल्ला केला होता. त्यानंतर पाठलाग करून खवले मांजर काढून घेण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र, त्याला सुरक्षितपणे वन विभागाने आपल्या ताब्यात ठेवले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार वनक्षेत्रपाल अमरजित पवार, वनरक्षक नागेश खोराटे, रणजीत पाटील, कृष्णा डेळेकर, वनमजूर तुकाराम जाधव, अनिल दळवी यांच्या पथकाने सदर खवले मांजर त्याचा अधिवास असलेल्या आजरा तालुक्यातील वन विभागाच्या जंगल परिसरात सोडले आहे.
खवले मांजर तस्करीप्रकरणी वन विभागाने आज रानोजी परसू शिंदे ( रा. उंबरवाडी, ता. गडहिंग्लज) व माणिक सागर देसाई (रा. सुळे, ता. आजरा) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे आज दिवसभर वन विभागाचे अधिकारी चौकशी करीत आहेत. खवले मांजर तस्करीप्रकरणी आणखीन सूत्रधार गजाआड होणे गरजेचे आहे, सध्या तालुक्यात गांजापाठोपाठ खवल्या मांजराचीही तस्करी सुरू असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आदिवास पाहून मांजराला सोडले...
खवले मांजर हा निशाचर प्राणी आहे. त्याचे खाद्य वाळवी, मुंग्या व वाळलेले बारीक लाकूड आहे. तो बिळे व पाणी बघून राहतो. आजरा तालुक्यातील जंगल परिसरात अशी स्थिती असल्याने त्या ठिकाणी त्याला सोडले आहे. अशी माहिती वनक्षेत्रपाल अमर पवार यांनी दिली.
फोटोकॅप्शन - तस्करीतील खवल्या मांजराला आजरा तालुक्यातील जंगल परिसरात सोडताना वन विभागाचे कर्मचारी.