कोल्हापूर : ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवेचा प्रारंभ उद्या, मंगळवारी होणार आहे. एअर डेक्कन कंपनीच्या सतरा प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानाचे दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी कोल्हापुरातून उड्डाण होईल. या ‘फर्स्ट फ्लाईट’द्वारे कचरावेचक महिला, दिव्यांग आणि निराधार मुले, शेतकरी दाम्पत्य, आदींना खासदार धनंजय महाडिक हे विमानप्रवास घडविणार आहेत.‘उडान’ योजनेअंतर्गत कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा मंगळवार, बुधवार आणि रविवारी पुरविण्यात येणार आहे. कोल्हापूर-मुंबईसाठी आॅनलाईन तिकीट नोंदणीची सुरुवात झाल्यानंतर दोन-तीन दिवसांत ‘फर्स्ट फ्लाईट’ फुल्ल झाली. ‘एअर डेक्कन’कडून चार दिवस विमानोड्डाणाची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. त्यामुळे विमानसेवा लवकर सुरू करावी, अशी विनंती खासदार महाडिक यांनी कंपनीला केली. त्यानुसार उद्या, मंगळवारपासून विमानसेवेचा प्रारंभ होणार आहे. सहा वर्षांनंतर कोल्हापुरातून उड्डाण करणाºया पहिल्या विमानातून कचरावेचक महिला, महिला बचत गटातील सदस्या, दिव्यांग आणि निराधार मुले अशा प्रत्येकी दोघांना, एका शेतकरी दाम्पत्याला कोल्हापूर-मुंबई असा विमानप्रवास खासदार महाडिक विनामूल्य घडविणार आहेत. त्यासह स्मॅक, गोशिमा, मॅक, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, हॉटेलमालक संघटना, आदींचे प्रत्येकी दोन पदाधिकारी अथवा सदस्य हे मुंबईहून कोल्हापूरला येणार आहेत. अशा वेगळ्या पद्धतीने प्रारंभ होणार आहे.नोंदणीला प्रतिसादमुंबईतून दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी निघणारे विमान कोल्हापुरात २ वाजून ४५ मिनिटाला पोहोचणार आहे. कोल्हापुरातून दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी विमानाचे उड्डाण होणार असून, मुंबईला ते ४ वाजून ५ मिनिटांनी उतरणार असल्याचे ‘एअर डेक्कन’चे कोल्हापुरातील व्यवस्थापक नंदकुमार गुरव यांनी सांगितले. ते म्हणाले, विमानसेवेच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद आहे.
कचरावेचक महिला, दिव्यांग मुले करणार विमानप्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:26 AM