प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हणबरवाडी (ता. करवीर) ते गारगोटी (ता. भुदरगड) या रस्त्यावरील प्रवासाची गती आता वाढणार आहे. २० फुटांच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण होऊन ते आता ३३ फुटांचे केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांचे हे काम मेअखेर म्हणजे सहा महिन्यांतच पूर्ण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू ठेवले आहेत. आतापर्यंत हणबरवाडी ते शेळेवाडीचे काम सरासरी ९५, तर कूर-गारगोटीचे काम ७० टक्के झाले आहे. यासाठी २४ कोटींचा निधी खर्च झाला आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने रस्त्यांसाठी भरघोस निधी मिळत आहे. त्यातूनच कोल्हापूर-गारगोटी रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी सहा महिन्यांतच म्हणजे मेअखेर ते पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रयत्न आहे. त्यानुसार कळंबा ते शेळेवाडी या २३ कि.मी. लांबीच्या मार्गाचे काम हाती घेतले आहे. यासाठी २३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील हणबरवाडी ते शेळेवाडी हे १४ कि.मी.चे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, १५ कोटींपैकी १३ कोटींची कामे झाली आहेत. हे काम सरासरी ९५ टक्के पूर्ण झाले आहे. पूर्वी २० फुटांचे असणारे रस्ते ३३ फूट रुंदीचे झाले आहेत. मार्गावरील सात पुलांचे रुंदीकरण व २०० मीटर लांबीचे डांबरीकरण शिल्लक आहे. दिशादर्शक फलक लावणे, पांढरे पट्टे ओढणे, अशी कामे सुरू आहेत. उर्वरित कळंबा ते हणबरवाडी या नऊ कि.मी.च्या रस्त्यासाठी आठ कोटी मंजूर असून, हे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल. ‘सार्वजनिक’च्या उत्तर विभागाच्या अखत्यारीत हे काम सुरू आहे. दक्षिण विभागाच्या माध्यमातून शेळेवाडी ते गारगोटी २१ किलोमीटर मार्गासाठी २२ कोटींच्या निधीची तरतूद केली असून, यापैकी १३ कोटींचे काम झाले आहे. ही टक्केवारी सरासरी ७० इतकी आहे. शेळेवाडी ते बिद्री या सहा कि.मी.चे काम पूर्ण झाले असून, सध्या कूर ते गारगोटी हे काम अंतिम टप्प्यात आहे. बिद्री ते कूर हे काम तांत्रिक अडचणींमुळे रखडले आहे. त्यासाठीचा निधी मंजूर झाला आहे; त्यामुळे ते लवकरच सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले....यामुळे झाले काम सुलभकोल्हापूर-गारगोटी या रस्त्यावर अतिक्रमण नसल्याने रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करताना सार्वजनिक विभागाला कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळेच हे काम सुलभ होऊन लवकर होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रवासाची गती आता वाढणार
By admin | Published: May 08, 2017 1:02 AM