कोल्हापूर : मुंबई- कोल्हापूर विमानसेवा अनियमित आणि वारंवार खंडित होत असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. त्यांना बेळगाव, बंगळुरूमार्गे मुंबईला जावे लागत आहे. ही सेवा नियमित करण्याबाबत शासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
कोल्हापूर- मुंबई मार्गावर आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी ट्रूजेट कंपनीकडून विमानसेवा पुरविली जाते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे सप्टेंबरमध्ये काही दिवस विमानसेवा स्थगित झाली. त्यानंतर कंपनीकडून दि.१२ ऑक्टोबरपासून सेवा पुन्हा सुरू झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि दिवाळीची सुट्टी असल्याने प्रवाशांची संख्या वाढली. सध्या रोज मुंबईहून सरासरी ६० प्रवासी कोल्हापुरात येतात, तर येथून ४० जण मुंबईला जातात. त्यात कोल्हापूर, सांगलीतील प्रवाशांचा अधिक समावेश आहे. तांत्रिक अडचणीमुळे मंगळवारपासून सेवा खंडित झाली. सेवा अनियमित असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. अनेक प्रवासी बंगळुरू, बेळगावमार्गे मुंबईला जात आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असूनही केवळ सेवेतील अनियमिततेचा कोल्हापूरला फटका बसत आहे.
उद्योग, व्यवसाय आदी कारणांसाठी मुंबईला जाणाऱ्या आणि तेथून कोल्हापूरला येणाऱ्या विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. वारंवार सेवा खंडित होत असल्याने त्यांची अडचण होत आहे. शासनाने गांभीर्याने विचार करून सेवा नियमित करावी. जर सध्याच्या कंपनीला नियमित सेवा देणे शक्य होत नसेल, तर संबंधित कंपनी बदलावी. -संजय शेटे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज
पुढील आठवड्यातही सेवेची शक्यता कमी
ट्रूजेट कंपनीच्या संकेतस्थळावर दि.१६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान तिकीट नोंदणी दाखवीत नाही. त्यामुळे पुढील आठवड्यातही सेवा सुरू होण्याची शक्यता कमी दिसते. प्रवाशांच्या दृष्टीने विचार करता सेवा नियमितपणे सुरू होणे आवश्यक आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया पर्यटनतज्ज्ञ बी.व्ही. वराडे यांनी व्यक्त केली.