लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : पांगिरे (ता. भुदरगड) येथील वेदगंगा नदीला आलेल्या पुरात खासगी ट्रॅव्हल्स बस वाहून गेली. चालकाच्या बेफिकिरीमुळे १४ जणाचे प्राण अडचणीत आले होते . पण ग्रामस्थांच्या मदतीने केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले.
नाशिक स्थित सावता माळी ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स (क्र. जीजे १४ झेड २३७०) (GJ 14 Z 2370) ही गोवा येथून नाशिककडे चालली होती. पांगिरे येथे नदीला महापूर आल्याने त्या गावातील तरुणांनी रस्त्यावर झाडाच्या फांद्या टाकून रस्ता बंद केला होता. रात्री १२ वाजेपर्यंत हे तरुण रस्त्यावर होते. पहाटे तीनच्या सुमारास ही ट्रॅव्हल्स पांगिरे येथे आल्यावर चालकाने पाण्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेने गाडी महापुरात घातली. गाडी मध्यभागी आल्यावर पाण्याचा दाब वाढल्याने गाडी अडकली. गाडीतील प्रवाशांनी जोरात आरडाओरड केली. पाण्याचा दाब जास्त असल्याने त्यांना चालत बाहेर पडता येत नव्हते. गावातील दिगंबर पाटील यांना प्रवाशांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने गावातील अमोल चव्हाण, नीलेश भराडे यांना फोन केले. ही बातमी समजताच अनेक जण धावत नदीवर पोहचले आणि ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू केले. मालवाहू ट्रकला वायर रोप बांधून त्याच्या साह्याने ट्रॅव्हल्स जवळ गेले. ट्रॅव्हल्समध्ये असणाऱ्या लोकांना रोपच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. पावसाच्या वाढत्या जोरामुळे पाण्याचा प्रवाह वेगवान होता. यावेळी ट्रॅव्हल्स मध्ये ११ प्रवासी आणि तिघे चालक, वाहक असे एकूण १४ लोक होते. यावेळी भैरू चव्हाण, अमोल चव्हाण, नीलेश भराडे, दिगंबर पाटील, निखिल भराडे, अमोल हसुरकर, संकेत बोरनाक, नामदेव गडकरी, कंटेनर चालक, ग्रामस्थ आणि युवक या सर्वांनी पुराच्या पाण्यात जाऊन प्रवाशांना वाचविण्यात यश मिळवले.
सर्व प्रवाशांना गावातील दत्त मंदिरात ठेवले असून प्रांताधिकारी डॉ. खिलारी हे लक्ष ठेवून आहेत.
२३ पांगिरे प्रवासी
फोटो ओळ
पांगिरे येथील दत्त मंदिरात उतरलेले प्रवासी.